Join us

अजितदादा आल्यापासून गद्दार, खोके बोलणं बंद झालं; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 3:35 PM

राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याने ४८ जागा निवडून आणण्यास महायुती कमी पडणार नाही असं त्यांनी म्हटलं.

मुंबई – २५ वर्षाच्या राजकारणात गेली ४ वर्ष याआधी कधीच आले नाहीत. पहिले ३ जणांचे लव्ह मॅरेज झाले. त्यानंतर देवेंद्रभाऊंनी आम्हाला बोलावले. त्यानंतर त्यांच्यासोबत बसलो. आता तिसरे इंजिन दादांनी जोडले. अजितदादा आल्यापासून गद्दार, खोके हे बंद झाले. अजितदादा बाहेर पडले परंतु एकही माणूस गद्दार म्हणत नाही. इतकी राष्ट्रवादीत दहशत आहे. २०२४ ला भगवा झेंडा फडकवणार आहोत असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.  

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं बैठक आयोजित केली होती. त्यात गुलाबराव पाटील म्हणाले की, २०२४ मध्ये राज्यात ४८ जागा महायुतीच्या निवडून येतील हा महायुतीचा संकल्प आहे. दादा आम्ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, परंतु आमच्यावेळी लफडी नको व्हायला. महायुती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है सध्या ही गरज आहे. ३ जणांच्या सरकारमध्ये ४८ जागांचा संकल्प करूया. १ रिक्षात आम्ही ४० गावात प्रचार करायचो. त्याकाळात आम्ही काम केले आहे. राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याने ४८ जागा निवडून आणण्यास महायुती कमी पडणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच जळगाव जिल्ह्याने कायम २ खासदार महायुतीला दिलेत. यापुढेही देऊ. इंडिया आघाडीच्या बैठकीत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. ममता बॅनर्जी उठून निघाल्या होत्या. शरद पवारांनी समजावून बसवले. आत्ताच ही परिस्थिती आहे. त्यामुळे पुढे जाऊन काय होईल माहिती नाही. आपण सगळे एकजूट राहिलो तर ४८ पैकी ४८ जागा जिंकू. जो कोणी आपल्या आडवे येईल त्याला तुडवून पुढे जाऊ असंही गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या सभेत सांगितले.

मुंबईच्या वरळी इथं महायुतीची बैठक होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक होत आहे. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सगळे नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत.

टॅग्स :गुलाबराव पाटीलउद्धव ठाकरेअजित पवार