मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:15 IST2025-03-07T06:15:00+5:302025-03-07T06:15:20+5:30
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.

मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपली वैयक्तिक आणि निराधार बदनामी केल्याचे सांगत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, आ. रोहित पवार आणि अन्य एकाविरुद्ध गुरुवारी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत दाखल केला. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोरे यांचे हे तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.
न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असताना आरोप कसे?
गोरे यांच्यावर एका महिलेशी संबंधित अनेक आरोप करण्यात आले होते. ऐन अधिवेशनात हे आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली होती. राऊत यांनीदेखील याबाबत वक्तव्य केले होते. त्यावर गोरे विधानसभेत म्हणाले की, सातारा जिल्हा न्यायालयातील हे २०१७ सालचे प्रकरण आहे.
त्याचा आधार घेत माझ्यावर बेछूट आणि खालच्या पातळीवरील आरोप करण्यात आले. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. माझी न्यायालयाने या प्रकरणातून २०१९ मध्येच निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील रेकॉर्डदेखील नष्ट करण्यास न्यायालयाने सांगितले होते.
मात्र तरीही लय भारी हे चॅनेल म्हणते की, या रेकॉर्डमधील ८७ चित्रफिती त्यांच्याकडे आहेत. हा न्यायालयाचा अवमान नाही का असा सवाल गोरे यांनी केला. एका यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांच्याविरुद्धही त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला.
राज्यपालांना बनावट पत्र देण्यात आले का?
या प्रकरणात राज्यपालांना निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. त्या निवेदनावर ज्याची सही आहे ती व्यक्ती म्हणते मी सही केलेलीच नाही. मग राज्यपालांना खोटे बनावट पत्र देण्यात आले का, असेही गोरे म्हणाले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी आता सोशल मीडिया हा अनियंत्रित झाला आहे. त्यामुळे हा हक्कभंग तत्काळ दाखल करून घ्या, असे सांगितले.