मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमोल मिटकरी यांच्या या विधानानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच फेसबुकवर जाहीर पोस्ट करत अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान केले आहे. त्यामुळे मिटकरींच्या विधानामुळे राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे बीडमधील नेते, परळीतील माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, हिंदु धर्मात कधीच मम् भार्या समर्पयामी असा मंत्र नसतो. कदाचित मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेले हे तंत्र असू शकते. ही जाहीर खिल्ली आहे असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजीराव धर्माधिकारी यांच्यानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरींचं विधान योग्य नव्हतं. अमोल मिटकरी यांचं हे वैयक्तिक विधान होतं. कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तसेच अमोल मिटकरी यांना सदर विधान करताना मी माइकवर टॅप करुन भाषण थांबविण्याची खूण केली होती, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अमोल मिटकरी
''आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती. यावेळी ब्राह्मणाने एक मंत्र म्हटला, ज्याचा अर्थ मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितला की, महाराज म्हणताय माझी पत्नी घेऊन जा.''
मिटकरींचा खुलासा-
मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे. माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही, असं मिटकरी म्हणाले.