Join us

मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी; जितेंद्र आव्हाडांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 7:49 PM

देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मुंबई- गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'  सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालवधीनंतर एकाच मंचावर दिसतील अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते.

मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे नाव टाकण्यात आलेलं नव्हतं. मात्र मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. 

सदर सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे नाव न टाकल्यानं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निषेध केला आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबियांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी सामान्यतः कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण, लतादीदींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्याचा मोह मला आवरता आला नाही. हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रेमाचे प्रतिक आहे. लतादीदी वयानेही मोठ्या होत्या व कर्मानेही. त्यामुळे हा पुरस्कारही सर्वांचा आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 

उद्धव ठाकरे 'फायर आजीं'च्या भेटीला-

 उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्रीबाहेर जमले. यामध्ये ८० वर्षांच्या एका आजींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुख्यमंत्री ठाकरेंनी आज संध्याकाळी या आजींची भेट घेतली. आजींच्या भेटीसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब परळच्या त्यांच्या घरी गेलं.

उद्धव ठाकरे आज आमच्या घरी आले. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यामुळे आनंद झाल्याची भावना आजी चंद्रभागा शिंदेंनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचं आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडावरचा मास्क हटवला आणि आजींसोबत संवाद साधला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडलता मंगेशकरउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्र सरकार