'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:24 AM2020-04-08T08:24:31+5:302020-04-08T08:43:07+5:30
भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे.
मुंबई: राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. मात्र माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करत होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, 5 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास दोन साध्या वेषातील तर दोघे वर्दीवरील पोलीस त्यांच्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास फर्मावले. कारण विचारल्यानंतर मात्र दहा मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे त्यांच्या पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेण्यात आले. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15 ते 20 जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. त्यानंतरही लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही, याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलीस त्याठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.