गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला होता, आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता यावर स्वत: मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ' माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.
'मी काय कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करु शकत नाही. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो, तुम्ही या मुद्द्यावर राजकारण करु नका. तुम्ही काय काम केले हे मी काही काढणार नाही. जगभरातील लोक महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे काम पाहण्यासाठी येतात. मी प्रामाणीकपणे काम करत आहे, मला काम करु द्या, असंही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...
'छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत, त्यांच्याशी कुणीही तुलना करु शकत नाही. मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. मला यात पडायचे नाही. मी त्या कार्यक्रमात फक्त उदाहरण दिले आहे, त्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असंही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मंत्री मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?
लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे शिवप्रताप दिन सोहळ्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांना संबोधिक करताना मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाची तुलना शिवरायांना आग्य्रातून करून घेतलेल्या सुटकेशी केली. यावेळी लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.