नवाब मलिक एक महिना झोपा काढत होते का?; मोहित कंबोज यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:51 AM2021-11-08T07:51:32+5:302021-11-08T07:52:05+5:30
मलिक यांनी रविवारी मोहित कंबोज यांच्यावर आरोपांची राळ उठवली. त्यावर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
मुंबई : आर्यन खान प्रकरणात माझ्यावर मास्टरमाइंड असल्याचा आरोप करणारे नवाब मलिक एक महिना झोपले होते का, असा पलटवार मोहित कंबोज यांनी केला आहे. मलिक यांना आताच मास्टरमाइंड वगैरे कसे सुचले, असा प्रश्न करतानाच सुनील पाटील याच्याशी बोलणे झाल्याचे रविवारी मलिक यांनी मान्य केले आहे. यापुढे आणखी अनेक गोष्टी समोर येतील. पाटील आणि मलिक यांची मैत्री आजची नसून वीस वर्षांपासूनची आहे, असा दावा कंबोज यांनी केला.
मलिक यांनी रविवारी मोहित कंबोज यांच्यावर आरोपांची राळ उठवली. त्यावर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे मलिक यांनी मान्य केले आहे. पाटीलच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसनेच हे षडयंत्र रचले आहे. यात आता त्यांचे पितळ उघडे पडू लागले आहे. त्यामुळे बिथरलेले मलिक आता व्यक्तिगत आरोप करू लागले आहेत. सुनील पाटील आणि सॅम डिसूझासोबत काय संबंध आहेत, याचा खुलासा मलिक यांनी करावा.
काशिफ खान याने मंत्री अस्लम शेख यांना वारंवार पार्टीला बोलावल्याचेही मलिक म्हणाले. खान आणि शेख यांच्या संबंधांचाच खुलासा त्यांनी केला आहे. ओळख नसलेला माणूस एकदा आमंत्रित करेल, ओळख असल्याशिवाय वारंवार कसे बोलावेल, एखाद्या मंत्र्यावर अनोळखी माणूस वारंवार दबाव कसा करू शकतो, असा प्रश्न करतानाच शेख आणि काशिफचे संबंध उघड झाले पाहिजेत. मंत्र्यांच्या मुलांशी त्याचे काय लागेबंध तेही उघड व्हायला हवेत, असेही कंबोज म्हणाले. मलिक यांनीच मंत्री आणि राजकारण्यांच्या मुलांबाबतची ही माहिती उघड केली.
मलिक यांनी ज्या हॉटेलचे नाव घेतले त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. त्यांनी माझ्यावर अकराशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. पण, असला काही घोटाळा नाही. मी निवडणूक लढविली तेव्हा माझी ३५० कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मी एक व्यापारी आहे. दरवर्षी पाच कोटींचा कर भरतो. मुंबईत जागोजागी मलिकांची संपत्ती कशी उभी राहिली, असा प्रश्नही कंबोज यांनी केला.
‘चौकशीची धमकी देऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न’
उलटसुलट आरोप करत लोकांचे मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न मलिक यांनी चालविला आहे. चौकशीची धमकी देऊन माझा आवाज दाबू शकतील, मला गप्प बसवू शकतील असे त्यांना वाटते. कोणतीही चौकशी करा. मी घाबरणारा नाही. चिंकू पठाण या ड्रग्ज माफियाचे समीर खानशी कोणते संबंध आहेत, यावर मलिक यांनी बोलायला हवे. दाऊद इब्राहिमचा खास असलेल्या चिंकू याने सह्याद्री अतिथिगृहात मागच्या वर्षी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती, हे आता समोर आले आहे. या गुप्त बैठकीत काय ठरले आणि आणखी कोण कोण उपस्थित होते, याचाही खुलासा व्हायला हवा, असे कंबोज म्हणाले.