मुंबई : नवाब मलिक यांची आम्हाला आता चिंता वाटत आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते. जावयाच्या प्रेमापोटी आणि स्वत:चे म्हणणे खरे करण्यासाठी ते राजकारणाच्या नीच पातळीवर जात आहे, असा हल्लाबोल भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले.
मलिक यांनी कितीही खोदकाम केले तरी त्यांना काहीही सापडणार नाही. बनावट नोटांप्रकरणी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप निव्वळ हास्यास्पद आहेत. मुन्ना यादव, हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध पदांवर नेमलेले होते. यापैकी हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर राजकीय आंदोलनाचे आरोप आहेत, असे शेलार म्हणाले.
आर्यन खान, शाहरुख खान यांना मलिक यांनीच अडचणीत आणले. अस्लम शेख यांचे नाव त्यांनी घुसडले. आता स्वपक्षाची नावे संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. अजून एका अल्पसंख्याक मंत्र्याचे नाव आणण्यासाठीच मलिक यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांची चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘तो’ तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता
हाजी हराफत शेख आणि हाजी हैदर आझम यांच्यावर गेल्या दोन वर्षांत एक साधा व दखलपात्र गुन्ह्याची नोंद नाही. असेल तर आंदोलनाचे गुन्हे असतील. नवाब मलिक यांनी सांगितले तो, मोहम्मद आलम शेख हा हाजी हराफत शेख यांचा भाऊ आहे. जेव्हा पकडला गेला तेव्हा तो काँग्रेसचा सचिव होता आणि सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असे शेलार यांनी सांगितले.
भाटीचे फोटो या नेत्यांबरोबरही; त्याला पळविले तर नाही?
मलिक यांनी रियाझ भाटीवरून आरोप केले, त्या भाटीचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असलम शेख यांच्यासोबतचे फोटो शेलार यांनी पत्रकारांना दाखविले. भाटी गायब असल्याचे सांगितले जाते. तो गायब आहे की त्याला पळविले गेले? राष्ट्रवादीने तर त्याला पळविले नाही?, अशी शंका येत असल्याचे सांगत फडणवीसांचा भाटीशी संबंध नाही, असेही ते म्हणाले.