मुंबई - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली, बोगस कागदपत्रांचा आधार घेतला, असे आरोप मलिक यांनी केले. त्यामुळे, वानखेडे विरुद्ध मलिक असा वाद रंगला आहे. मात्र, लोकमतने वादापलिकडचे मलिक उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आपल्या कुटुंबीयांबद्दलही मलिक यांनी भरभरुन सांगितलं.
सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या 'फेस टू फेस' कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. मलिक यांनी कुटुंबातील शिक्षणाच्या वातावरणाबद्दलही मनमोकळेपणे गप्पा मारल्या. आमच्यात एक म्हण आहे, कम पढा खर्चे जाए और जादा पडा तो घर से जाए... असे आमचे वडिल म्हणत होते. त्यामुळे, घरात शिक्षणासाठी तेवढं अनुकूल वातावरण नव्हत. घरातून कॉलेज शिकणारा पहिला मीच होतो, त्यामुळे, कॉलेजला जाण्यासाठी मला स्कूटर होती, नंतर बुलेटही घेऊन दिल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच, राजकारणातील काही व्यक्तींचे आवडते गुण सांगताना, त्यांना काही सल्लेही दिले आहेत.
अजित पवारांना मोलाचा सल्ला
अजित पवार यांच्या कामाची स्टाईल मला फार आवडते. काम करताना ते कधीही थकत नाहीत. तसेच, सगळं अगदी स्पष्टपणे बोलतात, लोकांना ते वाईट वाटत असेल. पण, मला चागंलं वाटतं, असे मलिक यांनी म्हटले. तसेच, त्यांनी आणखी मनमोकळं झालं पाहिजे, केवळ कामच करुन चालत नाही. ते लोकांपर्यंतही पोहचवलं पाहिजे. 'प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार' करायला हवा, असा प्रेमळ राजकीय सल्ला मलिक यांनी अजित पवारांसाठी दिला आहे. कारण, प्रेम केलं नाही तर नातं टिकणार नाही, आणि राजकारणात प्रचार केला नाही, तर लोकांना आपलं काम समजणार नाही, त्यामुळे, थोडं जास्त बोलायला हवं, असा सल्ला मलिक यांनी अजित पवार यांच्यासाठी दिला.
फडणवीसांच्या आजूबाजुला उपरे
देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्नदेखील मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर माणसांशी उत्तम संबंध राखणं याचाच धागा पकडत मलिक यांनी याच गुणाचा तोटा सांगितला. फडणवीस माणसांशी संबंध व्यवस्थित ठेवतात. मात्र त्यांना माणसं नीट ओळखता येत नाहीत. त्यांना त्यांच्या आजूबाजूला उपरे गोळा करून ठेवले आहेत, असं मत मलिक यांनी मांडलं.
बहिणीला शिक्षणाला पाठविण्यासाठी हट्ट
माझी बहिणी 12 वी चांगल्या मार्काने पास झाली. त्यामुळे, तिला एमबीबीएसचं शिक्षण द्यायचं मी ठरवलं. त्यासाठी, बँगळुरू युनिव्हीर्सिटीच्या रमैय्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे बहिणीने गोल्ड मेडल घेतले, त्यानंतर सायन हॉस्पीटलमधून एमडीच शिक्षण पूर्ण केलं. मात्र, बहिणीला बंगळुरूला पाठविण्यासाठी कुटुंबातील सर्वांचाच विरोध होता. पण, मी हट्ट करुन बहिणीला तिकडे पाठवलं. आज ती आयुष्यात यशस्वी डॉक्टर आहे, त्यामुळे, शिक्षणाशिवाय काहीच नाही, असे मलिक यांनी म्हटले. दरम्यान, मलिक यांना 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठा मुलगा एमबीए आहे, दुसरा वकील आहे, एक मुलगी फॅशन डिझायनर आहे. तर, सर्वात लहान मुलगी आर्कीटेक्ट असल्याचे मलिक यांनी सांगितले.