Join us

'घुसून सभा घेतली तर...'; शिंदे गटाचा इशारा, दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 3:49 PM

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

मुंबई- दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळाणार, याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. मात्र दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर जमण्याचे आदेश ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे. 

शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, असं म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आहेत. परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार खैरेंनी व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेवर शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोडून आणि घुसून सभा घेता येत नाही. शिवाजी पार्कवर कोणीही घुसखोरी करुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाला दिला आहे. 

शिवसेना भवनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

दरम्यान, शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास आधीच महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा त्या ठिकाणी होईल. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला शिवाजी पार्क देऊ नये, कारण शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे, अशी भूमिका घेत शिंदे गटाकडून महापालिकेला पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी मंगळवारी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांचे शिष्टमंडळ पालिकेच्या दादर जी-उत्तर विभागात सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना भेटले.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे गट ठामच-        

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर शिवाजी पार्क आम्हालाच द्यावा लागेल, असा इशारा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. सहायक आयुक्तांनी विधी खात्याकडे अर्ज पाठवून देखील ५ ते ६ दिवस उलटून गेले आहेत. परंतु विधी खात्याला सोमवारपर्यंत अर्ज मिळालाच नसल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे, हे पाहावे लागेल. विधी खात्याचा अहवाल शिवसेनेच्या बाजूने येणार असल्यामुळे मैदानाची परवानगी मिळेल, असा विश्वास शिवसेनेच्या पालिकेतील माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारशिवसेना