Join us

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची १३ कोटींची जमीन जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 11:31 AM

ईडीच्या कारवाईत तनपुरेंची एकूण १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असताना, ‘ईडी’ने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित असलेल्या तक्षशीला प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याच्या ९० एकर जमिनीसह एकूण १३ कोटी ४१ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये अहमदनगरमधील ४.६  एकर शेतजमिनीचा समावेश आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने नोंदविलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात साखर कारखान्याला केलेला कर्ज पुरवठा, कारखान्याचा लिलाव आणि खरेदी, विक्रीसंबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट देखील न्यायालयात सादर केला असून, तो न्यायालयात प्रलंबित आहे.

ईडीने केलेल्या तपासात २००७ मध्ये राज्य सहकारी बँकेने कर्जप्रकरणात बुडीत काढलेला राम गणेश गडकरी साखर कारखाना बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाइड ॲग्रो प्रॉडक्ट्सला विकला गेल्याचा आरोप आहे. यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे वडील राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.

ईडीने गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी तनपुरे यांची चौकशी केली होती. ईडीच्या मागणीनुसार प्राजक्त तनपुरे यांनी काही कागदपत्रे ईडीला दिली होती.  ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस युनिटेक ग्रुप आणि राज्य सहकारी बँकेशी संदर्भात मुंबईसह पुणे, नागपूर आणि अहमदनगरमधील नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. तनपुरे यांच्या कारखान्यासह कार्यालयातही झाडाझडती घेतली होती.

९४ एकर जमीनही जप्त 

सोमवारी ईडीकडून नागपूरमध्ये धाडी टाकल्यानंतर राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. ईडीच्या कारवाईत तनपुरेंची एकूण १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या धाडीत नागपूरमधील कारखान्याची एकूण ९० एकर जमीन, तर अहमदनगरमधील ४ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्त तनपुरेअंमलबजावणी संचालनालयराज्य सरकार