यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आणण्याचा प्रयत्न करत आहे.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...
दसरा मेळाव्यावरुन मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंकडे विचारधारा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा चांगला होईल, असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ठाकरेंकडे शिल्लक सेना राहिल्याचा टोलाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-
निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"