Join us

शिंदे गटातील मंत्री महोदयास कोरोनाची लागण; मुंबईत चाचणी, उपचार घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 4:20 PM

मंत्री राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

मुंबई - देशातून कोरोना बऱ्यापैकी संपुष्टात आला असून लॉकडाऊन हे नावही आता इतिहासजमा झालं आहे. मात्र,अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्यानंतर आता, शिंदे गटातील बडे नेते आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. राठोड यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. संजय राठोड यांना शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले असून त्यांचे मंत्रीपद वादात सापडले होते. विरोधकांनी शिंदे आणि भाजप सरकावर टिकेची झोड उठवली होती. 

मंत्री राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणं नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 

आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली.डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असे ट्विट राठोड यांनी शनिवारी केले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास त्यांनी सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही शिंदे सरकारमधील वादग्रस्त ठरलेल्या राठोड यांना कोरोना झाल्याने सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईकोरोना वायरस बातम्या