मुंबई : माझ्यावर आरोप झाल्यानंतर कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. चौकशीअंती पोलिसांनी मला क्लीन चिट दिली. त्याची कागदपत्रे चित्राताई वाघ यांना पाठवून देण्याची माझी तयारी आहे, असे मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी येथे माध्यमांना सांगितले.
राठोड यांना मंत्री करताच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर लगेच बोलण्याचे राठोड यांनी टाळले होते. पण बुधवारी त्यांनी मौन सोडले. ते म्हणाले की, अशा प्रकरणात किती त्रास होतो, हे तुम्हाला कळणार नाही. माझी विनंती आहे, पोलिसांच्या क्लीन चिटनंतर तरी आरोप थांबले पाहिजेत. पण जर आरोप असेच सुरू राहिले तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे.
चित्रा वाघ यांच्या टीकेवर राठोड म्हणाले, लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. तसा चित्रा वाघ यांनाही बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहिती नसेल, पण पोलिसांच्या चौकशीची सगळी कागदपत्रे मी त्यांना पाठवून देण्याची व्यवस्था करतो. माझ्याविरोधात कोणतीही पोलीस तक्रार नाही, एफआयआर तर दूरच राहिला.