शिंदे गटामध्ये सर्वात शेवटी सामील झालेले वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कामगार विभागाच्या मध्यान्ह भोजन योजनेतील निकृष्ठ दर्जाच्या जेवणाचा बांगर यांनी भांडाफोड केला आहे. अन्नाची पाहणी करताना त्यांनी उपहारगृहाच्या मॅनेजरच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.
राज्य सरकारच्या कामगार मध्यान्ह भोजन योजनेतून नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत कामगारांना भोजन दिले जाते. त्यासाठी, सरकारने मेन्यूही ठरवले आहेत. मात्र, करपलेल्या चपात्या, न शिजलेली डाळ आणि हलक्या तांदळाचा भातच या कामगारांना दिला जात असल्याचं आमदार बांगर यांनी उघडकीस आणलं. तर, हे पुरविण्यात येत असलेलं जेवणही निकृष्ट दर्जाचंच असल्याचा पर्दाफाश बांगर यांनी केला आहे. यासंदर्भात जाब विचारत असताना अबोल झालेल्या व्यवस्थापकाच्या थेट कानशिलातच त्यांनी लगावली.
सदर कंत्राटदाराला हे मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम देण्यात आलं आहे, त्याची चौकशी करुन कारवाई करावी, संबंधित अधिकऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणीही संतोष बांगर यांनी केली आहे. संतोष बांगर यांच्या या प्रकरणावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांनी हात उगारणं योग्य नाही. त्यांच्याकडून अनावधनानं घटना घडली असेल. संतोष बांगर यांनी सदर व्यक्तीची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याची तक्रार करायला हवी होती, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.