कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 04:45 PM2017-09-07T16:45:16+5:302017-09-07T16:45:25+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेल्या सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
मुंबई, दि. 7 - गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेल्या सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. स्वाभिमानीला राम राम करत सदाभाऊ खोत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. माझ्या संघटनेत राज्याच्या सर्व विभागांतील कार्यकर्त्यांचा समावेश होणार असून, संवादानं शेतक-यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
नव्या संघटनेच्या धोरणासाठी मसुदा समिती स्थापन केल्याची माहिती यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. बाजार समिती कायद्यात बदल करण्याच निर्णय घेतला. स्वतःच्या अस्तित्वासाठी सत्ता सोडण्याचा माझ्यावर दबाव आणण्यात आला. वैयक्तिक स्वार्थापोटी म्हणेल ते खरे करण्याची काही लोकांची वृत्ती असते, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर नाव न घेता टीका केली आहे. संघटनेतून माझे पाय कापण्याचे प्रयत्न झाले. तुम्ही आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग मी मंत्रिपदाचा राजीनामा देता, असं आवाहनही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना दिलं आहे. ‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिले होते.
‘मला आमदारपद, मंत्रिपद भाजपाच्या कोट्यातून मिळाले असल्यामुळे, शेट्टींनी काढण्याचा संबंधच कुठे येतो? मला काढायचे की ठेवायचे ते भाजपाचे नेतेच ठरवतील’, असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर खोत यांना राज्य मंत्रिमंडळातून काढण्याबाबत खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली होती. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो आणि सरकारमध्ये गेल्यानंतरही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. मंत्री झाल्यानंतरही माझ्या छातीवरचा संघटनेचा बिल्ला मी काढला नव्हता. पण माझे मंत्रिपद शेट्टींच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे त्यांनी वारंवार माझ्यावर टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलाचाही जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक पराभव केला होता. तरीही मी संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत होतो. मात्र त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे नाटक करून माझी हकालपट्टी केली. एवढ्यावर समाधान झाले नसल्यामुळे माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
ते म्हणाले की, राजू शेट्टींनी शेतकरी हितापेक्षा स्वत:च्या हितालाच नेहमी प्राधान्य दिले. त्याचा आणि इतर भानगडींचा मी साक्षीदार आहे. ऊस दराबाबत कारखानदारांच्या बैठकीत बोलायचे एक आणि शेतक-यांसमोर दुसरेच सांगायचे. आम्हालाही त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटायचे.