Join us

MPSC सदस्यांच्या नेमणुकीबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 3:32 PM

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला लगावला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.

मुंबई - MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले होते. मात्र, अद्यापही ही जागा नियुक्त केल्याचे कुठेही दिसत नाही. त्यावरुन, भाजपाने उपमुख्यमंत्री व सत्ताधाऱ्यांना सवाल विचारला आहे. यासंदर्भात आता, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला लगावला आहे. MPSC च्या नियुक्त्या रखडल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, रोहित पवार यांच्यावरही टीका केली आहे. मात्र, या नियुक्तीसंदर्भात आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती राज्यपालांना करणार आहे, असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. 

रोहित पवारांवर पडळकरांची टीका

आपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. ‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं.. आणि MPSC सदस्यांच्या नियुक्त्यालाच ३० दिवस लावायचे तर MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या कधी? कृपया याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, या शब्दांत हल्लाबोल करत, नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

राजभवनामुळे लबाडी उघड

रोहित पवारांनी सांगितले होते, पण आता तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत. एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना ३१ जुलैआधी याद्या पाठवल्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. मात्र, राजभवनमधून २ ऑगस्ट रोजी याद्या आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात, हे सिद्ध झाले आहे, असे पडळकर म्हणाले.  

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीएमपीएससी परीक्षारोहित पवारगोपीचंद पडळकर