राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना ‘धक्का’, शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 07:12 AM2017-08-21T07:12:37+5:302017-08-21T07:12:37+5:30
गेली ४५ वर्षे शिवसेनेत निष्ठेने कार्यरत असलेले शिवसेनेचे व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह, अनेक शिवसैनिकांनी नुकताच मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबई : गेली ४५ वर्षे शिवसेनेत निष्ठेने कार्यरत असलेले शिवसेनेचे व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह, अनेक शिवसैनिकांनी नुकताच मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. परिणामी, गृहनिर्माण राज्यमंत्री आणि जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना येथे मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महानगरपालिका २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्यामुळे, शिवसेनेचे व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, माजी उपविभाग प्रमुख श्रीधर खाडे यांनी पक्षांतर्गत नाराजीमुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७७ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. दुर्दैवाने या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले ज्ञानेश्वर सावंत, श्रीधर खाडे या दोघांनाही पराभव पत्करावा लागला होता. महापालिका निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे, ज्ञानेश्वर सावंत, श्रीधर खाडे मागील कित्येक महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख श्रीधर खाडे, माजी उपशाखा प्रमुख संजय म्हात्रे, प्रमोद दळवी, स्वप्निल सुर्वे, प्रकाश शिंदे, प्रमोद कदम, सुभाष साळवी यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी विधानसभा प्रभाग क्रमांक ७४ च्या नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्यातर्फे करण्यात आले होते. जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथे झालेल्या कार्यक्रमाला उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष आणि आमदार अमित साटम, नगरसेविका प्रीती सातम उपस्थित होते.
दरम्यान, ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख श्रीधर खाडे, माजी उपशाखा प्रमुख संजय म्हात्रे, प्रमोद दळवी, स्वप्निल सुर्वे यांनी भाजपात प्रवेश केला.