Join us

सलाम! अपघातात पत्नी गेली, प्रकृती खालावली; पण तरीही केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

By मुकेश चव्हाण | Published: January 20, 2021 2:39 PM

श्रीपाद नाईक उपचारादरम्यान देखील रुग्णालयातून आपलं काम बजावत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई: केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत आणखी सुधारणा झाली, अशी माहिती गोमेकॉ रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

श्रीपाद नाईक उपचारादरम्यान देखील रुग्णालयातून आपलं काम बजावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबात माजी खासदार निलेश राणे यांनी देखील ट्विट केले आहे. निलेश राणे म्हणाले की, आपल्या कर्तव्याशी कसं एकनिष्ठ असावं ह्यांचे उत्तर. श्रीपाद नाईकजी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला त्यात त्यांनी त्यांच्या पत्नींना सुध्दा गमावले पण ते आपल्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत. तब्येत ठिक  नाही तरी ते काम करत आहेत. त्यामुळे श्रीपाद नाईकजी यांचा अभिमान वाटतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, कर्नाटकमधील येल्लापूर येथे नाईक यांच्या कारला हा भीषण अपघात झाला होता. हा अपघातात इतका भीषण होता की त्यात नाईक यांच्या कारचा चेंदामेंदा झाला. तसेच या अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

राजनाथसिंह यांच्याकडून प्रकृतीविषयी विचारणा 

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून नाईक यांच्या आरोग्याविषयी विचारणा केली.

पत्नीच्या मृत्यूची कल्पना

श्रीपाद नाईक यांना त्यांची पत्नी विजया यांचा मृत्यू झाला असल्याचे अगोदर सांगितले गेले नव्हते. बुधवारी रात्री त्यांना त्याची कल्पना दिली गेली. मुलाकडूनच त्यांना माहिती दिली गेली. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी खरी माहिती नाईक यांना देणे गरजेचे होते. त्यानुसार माहिती दिली गेली. पत्नीच्या निधनाचे वृत्त सांगितले गेल्यानंतर श्रीपाद नाईक यांचा रक्तदाब तेव्हा किंचित हलला होता. मात्र आता ती समस्या नाही. गुरुवारी त्यांच्या रक्ताच्या व लघवीच्याही काही चाचण्या केल्या गेल्या. त्यांचे अहवालही नॉर्मल आले.

टॅग्स :केंद्र सरकारअपघातनिलेश राणे