Join us

भाषा संचालनालयाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांकडून काढले

By admin | Published: May 22, 2015 1:14 AM

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राज्यकर्त्यांची होणारी लुडबूड, वेळेचा अपव्यय, वशिलेबाजी टाळण्यासाठी मंत्र्यांकडील अधिकार काढून घेण्यात आले आहे.

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राज्यकर्त्यांची होणारी लुडबूड, वेळेचा अपव्यय, वशिलेबाजी टाळण्यासाठी मंत्र्यांकडील अधिकार काढून घेण्यात आले आहे. त्याऐवजी भाषा संचालनालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता भाषा संचालकांकडे सोपविले आहेत. विकेंद्रीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. यापूर्वी प्रशासनातील कालापव्यय टाळून निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी होण्याच्या दृष्टीने हे अधिकार भाषा संचालकाला देण्यात आले आहे. तसेच विभागातील त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. याबाबत मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली नुकताच शासन निर्णय काढला. सध्या भाषा संचालनालयातील भाषा संचालकपदी औरंगाबादच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आहेत. डॉ. कुलकर्णी या औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका असून भाषा संचालकपदाचा अतिरिक्त भार २ मे, २०१५ पासून सांभाळत आहेत. या संस्थेचा पूर्णवेळ कार्यभार सांभाळण्यासाठी एकही शासकीय अधिकारी मिळू नये यातूनच शासन भाषाविषयक यंत्रणांना काय मान देते हे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)