Join us  

लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 6:47 AM

तुम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न करा : थोरात

मुंबई : विधानसभेनंतर आणखी काही पक्ष आमच्याकडे येतील, असा दावा भाजप कोअर कमिटीचे सदस्य आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तर तुम्ही आता विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते का ते पाहा, असे उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना दिले. कोणाला किती जागा हे महत्त्वाचे नसून महाविकास आघाडी एकदिलाने तुमचा पराभव करेल, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. आम्ही जिंकण्यासाठी उभे आहोत, कोणाला पाडण्यासाठी नाही, असे दमदार विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले व महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपण दिलेला निकालच शाश्वत आहे, असा दावा  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. 

ही अनोखी शाब्दिक जुगलबंदी ‘लोकमत लोकनेता सन्मान’ सोहळ्यात रंगली. नेत्यांनी एकमेकांवर केलेले शाब्दिक हल्ले, उपस्थितांनी हशा आणि टाळ्यांनी दिलेला जोरदार प्रतिसाद यामुळे वाय. बी. चव्हाण सेंटर दणाणून गेले. ‘लोकमत लोकनेता सन्मान २०२४’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झाला. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे या वेळी अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यानिमित्ताने लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत यूट्यूबचे संपादक आशिष जाधव यांनी या नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलते केले.

देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे 

लोकमतचा अंदाज १०० टक्के खरा निघतो. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. प्रत्येक पक्षाने वेगळी योजना आखली आहे. नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. राज्यात शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्या-त्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी घेईल, जो उमेदवार निवडून आल्यानंतरही लोकांसोबत राहील, अशांनाच निवडून देण्याचे जनमानस आहे - डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मिडिया

माझ्या निकालात बदल होणार नाही

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे, पण मी दिलेला निर्णय शाश्वत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे अवलोकन केले आणि त्याआधारेच योग्य निर्णय दिला, त्यात बदल होणार नाही - राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष 

ते ओरिजनल राज ठाकरे आवडतात

महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असे काही नाही. आम्ही सर्व भाऊ एकत्र आहोत. निवडून येण्याची क्षमता या निकषावरच तिकीट दिले जाते. राज ठाकरे कसे आहेत ते महाराष्ट्राने पाहिले आहे. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणणारे राज ठाकरे त्यांच्या मूळ पदावर आले तर आनंद आहे. मनसे जिंकण्यासाठी उभी की लोकांना पाडण्यासाठी, हे त्यांनीच स्वतःला विचारावे. सुधीर मुनगंटीवार आमचे मित्र आहेत. ते अधून मधून जोरात बोलतात. भाजप मध्ये हल्ली मूळ भाजपचे कोण हे शोधण्याची वेळ आली आहे. इतके अन्य पक्षातील लोक त्यांच्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना विरोधी पक्ष नेते पद देखील मिळेल की नाही शंका आहे - बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते

मुख्यमंत्री कोण हे अमित शाह ठरवतील

विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त जागांची मागणी केलेली नाही. आम्ही २८८ जागा महायुतीच्या म्हणून लढविणार आहोत. शिंदे, अजितदादा की भाजपचा मुख्यमंत्री हे महत्त्वाचे नाही. महायुतीचे नेते म्हणून तिन्ही पक्षांनी अमित शाह यांना मान्यता दिली आहे. आम्ही तिन्ही पक्ष स्वतंत्र असलो तरी गंगा, जमुना आणि सरस्वती यांच्या संगमाप्रमाणे आमचा महासंगम झाला     आहे. निवडणुकीनंतर आमचे नेते अमित शाह सांगतील तो मुख्यमंत्री होईल - सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ मंत्री, भाजप

मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही

विधानसभेच्या २८८ जागा आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. कुणाला जास्त आणि कुणाला कमी हा मुद्दा नाही. ज्याची निवडून येण्याची क्षमता त्याला ती जागा दिली जाईल. मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात वाद नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित चांगले काम केले. त्यामुळे आताही आमच्या एकीचे चांगले परिणाम महाराष्ट्राला पाहायला मिळतील - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

सर्वच पक्ष आमचे प्रतिस्पर्धी

आमचा पक्ष राज्यातील सर्वच जागा लढविणार आहे. त्यामुळे सर्वच आमचे प्रतिस्पर्धी पक्ष असतील. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहोत. या वेळीही आम्ही व्हिडिओ लावणार आहोत, पण ते विविध समस्यांचे असतील. गेल्या वेळच्या त्रुटी या वेळी दिसणार नाहीत. मनसेची स्पेस वाढलेली दिसेल - नितीन सरदेसाई, माजी आमदार, मनसे

मनसेचा कुणी शत्रू नाही

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये असणाऱ्यांनाच काय करायचे ते कळत नाही. त्यांच्या कबड्डीत आम्ही कुठे घुसणार? त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. मनसेचा कुणी शत्रू नाही. राज्यातील समस्या हाच मनसेचा शत्रू आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी किंवा महायुतीचे सरकार बनविण्याची वेळ आली तर आम्ही समविचारी पक्षांसोबत जाऊ - बाळा नांदगावकर, माजी राज्यमंत्री, मनसे 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४सुधीर मुनगंटीवारबाळासाहेब थोरातअंबादास दानवे