राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून ओबीसी आणि मराठा असा वाद रंगत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांकडून स्पष्टपणे विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसींच्या एल्गार सभांचं आयोजन केलं जात आहे. या सभांमधून ओबीसी नेते ओबीसींमधून मराठा आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आहेत. तर, जरांगे पाटील हेही छगन भुजबळ यांच्यावर जोरदार प्रहार करत आहेत. राज्य सरकारमधील इतर मंत्री आणि मराठा नेते शांत असल्याचे दिसून येते. त्यातच, मंत्री तानाजी सावंत यांना याबाबत प्रश्न विचारला असता, ते पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं.
तानाजी सावंत यांनी यापूर्वीही मराठा आरक्षणावर बोलताना स्पष्टपणे भूमिका मांडली होती. दोन वर्षात कोणीच आंदोलन केलं नाही, आताच आंदोलन का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आपल्याला आरक्षण मिळालं होतं, त्यानंतर मिळालेलं आरक्षण रद्द झालं. त्यानंतर एक वादळ निर्माण झालं. जर-तरच्या गोष्टी सांगायला मी पंचाग घेऊन बसलेलो नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा सावंत यांना मराठा आरक्षणाच्या संबंधित प्रश्न विचारला असता ते पत्रकारावरच भडकल्याचं दिसून आलं.
मराठा समाजास २०२४ पर्यंत आरक्षण न मिळाल्यास मी राजीनामा देईन, असे सावंत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाची आठवण करुन देत पत्रकाराने प्रश्न विचारला. आता, तुम्ही राजीनामा देणार का, त्यावर सावंत यांनी काहीही न बोलता तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला, तुम्ही पळ काढताय का, असे म्हटल्यानंतर मंत्री सावंत पुन्हा परत फिरले. तसेच, मी पळ काढत नाही, मराठा आरक्षणाबद्दल जे चाललंय ते तुम्हीही बघताय. पत्रकारांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत आगीत तेल ओतायचं काम करू नये, असे म्हणत सावंत यांना राग अनावर झाल्याचं दिसून आलं.
... तर राजीनामा देईन - सावंत
दरम्यान, दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं. मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या विधानाबद्दल सावंत यांनी माफी मागितली होती. त्यावेळी, ''मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे. जर २०२४ पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देईल आणि मोर्च्यात सहभागी होईल. हा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालूये. मी पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत मी माफी मागायला तयार आहे. माझा समाज आहे मला माफी मागायला काही वाटणार नाही'', असं सावंत यांनी म्हटलं होतं.