महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:44 PM2023-06-20T14:44:10+5:302023-06-20T14:55:17+5:30
मनीषा कायंदेंच्या प्रवेशानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तसेच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले.
मनीषा कायंदेंच्या प्रवेशानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे. आम्ही महाराष्ट्रात चांगली विकासकामं करत आहोत. उरलेली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे. तसेच विरोधक टीका करणारचं, कारण सत्ता गेल्यानंतर जी तडफड होते त्याचं उदाहरण आहे. खोटा इतिहास लिहण्यात अनेक लोक पारंगत आहेत. वैयक्तिक पातळीवरचे टीका करणे काही लोकांचा धंदा बनला आहे, अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली आहे.
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावार दावा केल्यास अंबादास दानवे यांचं पद जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे.
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरचं विधान परिषदेतील संख्याबळ पुढील प्रमाणे आहे.
भाजपा- २२
ठाकरे गट- ०९
शिंदे गट- ०२
राष्ट्रवादी काँग्रेस- ०९
काँग्रेस- ०८
अपक्षइतर- ०७
एकूण रिक्त जागा- २१
एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी-
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनीषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनीषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.