भविष्यात वेदांता अन् टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार; उदय सामंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:59 PM2022-10-28T12:59:05+5:302022-10-28T13:16:55+5:30
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत.
मुंबई- वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात यावा यासाठी मी प्रयत्न केले. युवा पिढीसाठी मी प्रयत्न केला त्यात माझं काही चुकलं नाही. रोजगार देण्यासाठी नुसत्या गप्पा मारुन काही उपयोग नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
टाटा एअरबसच्या प्रकल्पाबाबत अशी माहिती समोर आली की, २१ सप्टेंबर २०२१ रोजी या प्रकल्पाबाबतचा सामज्यंस करार झाला होता. मात्र, करार झाला होता तर त्याबाबतचे मला एकतरी पत्र दाखववावे, असं आव्हान उदय सामंत यांनी विरोधकांना दिलं आहे. तसेच भविष्यात वेदांता किंवा टाटा एअरबसपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार आहे. त्यामुळं बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. राजकारणासाठी राजकारण करु नये, विकासासाठी सर्वांनी एकत्र येण गरजेचं असल्याचं आवाहान देखील उदय सामंत यांनी केलं आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. ''टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहान येथे होत आहे. त्यासाठी, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. टाटा कोलॅबरेशनसह हा प्रकल्प येत आहे, त्यामुळे टाटा एव्हीएशनच्या लोकांसाठी आम्हाला बोलावं लागणार आहे,'' असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं होतं.
मोदी सरकारकडून उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका सुभाष देसाई यांनी केली. #Shivsena#EknathShinde#devendrafadnvishttps://t.co/QpXGPHC7Kg
— Lokmat (@lokmat) October 28, 2022
महाविकास आघाडीने काहीच केले नाही - उपमुख्यमंत्री
टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाला नव्हता. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"