Join us

'दावोस दौऱ्याचा जनतेला सगळा हिशोब देणार, दिशाभूल करणं थांबवा'; उदय सामंत यांनी बजावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 5:42 PM

आदित्य ठाकरेंच्या या आरोपवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.  

दावोस दौऱ्याला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ७० लोकांना सोबत घेऊन जात आहेत. ज्यांचा दौऱ्याशी काडीमात्र संबंध नाही, असा आरोप माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दौऱ्यासाठी होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च हा जनतेच्या पैशातून उधळला जाणार आहे. गरज नसतानाही फक्त फिरण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री हे ‘वऱ्हाड’ दावोसला घेऊन जात आहेत का?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच किती लोकं जाणार आहेत?, मुख्यमंत्री तिथे कोणाला भेटणार आहेत, याची यादी जाहीर करावी, असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या आरोपवर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. दावोस दौऱ्याचा सगळा हिशोब जनतेला देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जगाच्या पातळीवर महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. 

जनतेची दिशाभूल करणं थांबवावं. एकही रुपयाचा अपव्यय होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौऱ्या एतिहासिक ठरले. शिष्टमंडळ स्वत:च्या खर्चाने दावोसला गेलं आहे, असंही उदय सामंत म्हणाले. दावोस दौऱ्यात एतिहासिक एमओयू करणार असल्याची माहिती देखील उदय सामंत यांनी दिली. तसेच वेदांता फोक्सकॉन आम्ही कधी घालवला नव्हता, तो घालवल्याचा आरोप आमच्यावर केला जातोय, अशी टीका उदय सामंत यांनी केली. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले. 

दावोसवर ३४ कोटींची उधळण, बळीराजाकडून मात्र वसुली

राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकार एकीकडे दावोसवर ३४ कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाने करवसुली तात्काळ थांबवावी, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

टॅग्स :एकनाथ शिंदेउदय सामंतमहाराष्ट्र सरकारआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे