ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू; विजय वड्डेट्टीवार यांचं वक्तव्य
By मुकेश चव्हाण | Published: December 5, 2020 08:29 PM2020-12-05T20:29:44+5:302020-12-05T20:44:58+5:30
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे.
मुंबई/ जालना: राज्यात आरक्षणावरुन राजकारण चांगलचं ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे. मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असं विधान मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना विजय वड्डेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार विजय वड्डेट्टीवार म्हणाले की, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं विजय वड्डेट्टीवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. मात्र औरंगाबादच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विजय वड्डेडीवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात प्रास्ताविकामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्त्ये शांत झाले आणि मेळावा पार पडला.
ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चा संदर्भात आज मराठवाडा विभागीय बैठकी आज दिनांक 5 डिसेंबर, शनिवार ला सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथे पार पडली . @INCMaharashtra#OBCpic.twitter.com/PAxmCyS5V9
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 5, 2020
बालाजी शिंदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना छगन भुजबळ यांनी पिवळ्या झेंड्याला राष्ट्रवादीकडे नेत ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे पाप केले अशी टीका केली. मेळाव्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. दहा ते बारा कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर जमा होऊन बालाजी शिंदे यांना भुजबळ यांनी काय पाप केले ? याचा जाब विचारला. यामुळे गोंधळ उडाला. काही वेळानंतर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी करत माईकचा ताबा घेतला. छगन भुजबळ आमचे नेते असून आमचे आदर्श आहेत असे म्हणत वड्डेटीवार यांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत केले. यानंतर त्यांनी अर्धातास मार्गदर्शन केले.