मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यांत लॅाकडाउन लागू करण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय बंद आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिम चालक- मालकांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भेट घेऊन अनेक समस्या मांडल्या होत्या. यानंतर राज ठाकरे यांनी तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतंय बघू, असं राज ठाकरेंनी सांगितले होते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्यात याव्यात आणि हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरेंनी घेतलेला पवित्रा आणि देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा इम्पॅक्ट आता झाल्याचे दिसून येत आहे.
आगमी दोन दिवसांत राज्यात जिम सुरु करणार अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपाकडून जिम सुरु करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज जिम सुरु करण्यासाठी सरकार तयार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले आहे.
तत्तपूर्वी, राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. तसेच सर्व नियमांचे पालन करुन जिम व्यवसाय सुरु करण्यासाठी तयार असल्याचे जिम चालकांनी राज ठाकरेंना सांगितले. यानंतर तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतंय बघू, असं राज ठाकरेंनी सांगितले होते. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंना पत्र लिहून लवकरात लवकर जिम सुरु करा, अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे. आज राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा विचार त्यामागे असला तरी राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचारही व्हायला हवा. करोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता तर जगात सहाव्या क्रमांकावर असता,' अशी चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.