मुंबई : मंत्रालयात वेटरच्या १३ जागांसाठी तब्बल ७ हजार अर्ज आले. त्यात पदवीधरच नव्हे तर पदयुत्तर उमेदवारही होते. यावरुन राज्यात किती बेकारी आहे, हे दिसून येते, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना चव्हाण यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये ७० लाख कोटींवर नेणार असे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्यपाल सांगत आहेत. सध्या राज्याची अर्थव्यवस्था २७ लाख कोटींची आहे. विकासदर ७.५% आहे असे तुम्हीच सांगता. या गतीने ७० लाख कोटींपर्यंत पोहोचण्यास २०३२ साल उजाडावे लागेल आणि जर तुम्ही तुमचेलक्ष्य २०२५ मध्येच पूर्ण करणार असाल तर विकासदर १६.५% करावा लागेल. जगात एकाही देशाला आजवर ते शक्य झालेले नाही. खोट्या आकड्यांची धूळफेक का करता? असा सवालही त्यांनी केला.प्रकल्प अडकले न्यायालयातगेल्या पाच वर्षांत एकही मोठा प्रकल्प पूर्ण झाला नाही. सगळे न्यायालयात अडकले. मुंबईत ३४, पुण्यात २४ कारची शोरुम बंद झाली आहेत. गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कारचे उत्पादन कमी केले आहे. औद्योगिक विकास दर २०१५-१६ साली ८.८ टक्के होता. २०१८-१९ मध्ये तो ६.९ टक्क्यावर आला आहे. ही कसली प्रगती? असा सवालही त्यांनी केला. या सरकारने शिक्षणाचा तर पुरता विनोद करुन टाकला. जगातील पहिल्या ८०० विद्यापीठात राज्यातील एकही विद्यापीठ नाही, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
मंत्रालयातील नोकरभरती; वेटरच्या १३ जागांसाठी ७ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:30 AM