Join us

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्र्याच्या ओएसडीला अटक

By admin | Published: April 30, 2017 3:53 AM

एनआरआय पोलिसांनी राज्य मंत्री मंडळातील मंत्र्याच्या ओएसडीला (विशेष कार्य अधिकारी) अटक केली आहे. विवाहित असतानाही त्याने एका तरुणीसोबत लग्न करून

नवी मुंबई : एनआरआय पोलिसांनी राज्य मंत्री मंडळातील मंत्र्याच्या ओएसडीला (विशेष कार्य अधिकारी) अटक केली आहे. विवाहित असतानाही त्याने एका तरुणीसोबत लग्न करून उलवे येथे भाड्याच्या घरात ठेवले होते; परंतु त्यांच्यात वाद होऊ लागल्याने सदर तरुणीने गतमहिन्यात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, घराच्या झडतीमध्ये तिचा मंगळसूत्र घातलेला फोटो पोलिसांच्या हाती लागल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. स्मिता वानखेडे (२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची नाशिकची राहणारी आहे. ९ मार्च रोजी तिने उलवे सेक्टर २० येथील घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तिची डायरी तपासली असता, त्यात नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचे लिहिलेले आढळले. त्यावरून पोलिसांनी काहींना आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून संशयित म्हणून ताब्यातही घेतले होते. मात्र, घटनेच्या काही दिवसांनी पुन्हा पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता, तिने मंगळसूत्र घातलेला फोटो पोलिसांच्या हाती लागला; परंतु तिने लग्न केल्याचे घरच्यांना माहीत नव्हते. यावरून पोलिसांनी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचा ओएसडी रमेश साळवे (४५) याला ताब्यात घेतले होते. अधिक तपासात त्या दोघांमध्ये फोनवरून दिवसातून अनेकदा संभाषण झाल्याचे उघड झाले. शिवाय, घरातून हाती लागलेल्या काही कागदपत्रांवरून त्यांच्यात सतत वाद होत होता अशीही माहिती पोलिसांच्या हाती लागली. यावरून १९ एप्रिल रोजी त्याला नेरुळ येथील घरातून पोलिसांनी अटक केली आहे. वर्षभरापूर्वी स्मिता काही कामानिमित्ताने मंत्रालयात गेली असता, त्या ठिकाणी या दोघांची ओळख झाली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्यात संपर्क वाढल्याने गाठीभेटी सुरू होत्या. या वेळी रमेश याने तो विवाहित असल्याचे लपवून तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर तिला उलवे येथे भाड्याचे घर घेऊन दिल्यानंतर ती वाशीतील गर्ल हॉस्टेलऐवजी त्या ठिकाणी राहत होती. पोलिसांनी रमेश साळवेला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.