रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:30 AM2022-08-18T06:30:53+5:302022-08-18T06:31:00+5:30

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या १५ वर्षांच्या राजवटीत पीए, पीएस असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही, असा आदेश काढला होता.

Ministers will appoint PA, PS only after checking their records; Chief Minister, Deputy Chief Minister gave instructions to all | रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

रेकॉर्ड तपासूनच मंत्र्यांकडे पीए, पीएस नेमणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली सर्वांना सूचना

googlenewsNext

मुंबई : मंत्र्यांनी आपल्याकडे आधीच्या सरकारमधील पीए, पीएस नेमायचे असतील तर त्यांचे रेकॉर्ड तपासा, ते बदनाम झालेले असतील तर त्यांना अजिबात घेऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले आहे. त्यामुळे आता या पीए, पीएसचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू झाले आहे.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या १५ वर्षांच्या राजवटीत पीए, पीएस असलेल्यांपैकी कोणालाही घेता येणार नाही, असा आदेश काढला होता. त्यामुळे अनेकांना त्यांच्या विभागात परत जावे लागले होते. यावेळीही तसाच आदेश काढला जाईल, असे म्हटले जात होते; पण आता शिंदे-फडणवीस यांनी त्यात काहीसा बदल केला आहे. आधीची सगळीच माणसे वाईट होती, असे समजण्याचे कारण नाही. त्यातील काही चांगलेदेखील होते; पण काही अतिशय बदनाम झालेले होते. या बदनाम माणसांना पीए, पीएस, ओएसडी म्हणून आणू नका, अशी सुधारणा पूर्वीच्या भूमिकेत करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, काही मंत्र्यांनी त्यांच्याकडे कोण पीए, पीएस, ओएसडी असतील याची यादी खातेवाटप होण्याआधीच सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवून दिली. त्यात आधीच्या मंत्र्यांकडील पीए, पीएसचाही समावेश होता; पण रेकॉर्ड तपासून माणसे घ्या, असे आता वरून बजावण्यात आल्याने त्यांच्यावर काही नावे मागे घेण्याची वेळ आली आहे. विधिमंडळ अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले तेव्हा भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बघून अनेकांना धक्का बसला. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात असलेल्या एकूण एक कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन या भाजप मंत्र्यांच्या कार्यालयात करण्यात आले आहे.

‘आमचा सगळा स्टाफ थेट वरून येणार’

भाजपचे चार मंत्री असे आहेत, की ज्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाकडून नावे पाठविली जातील त्यानुसार पीए, पीएस, ओएसडीच नव्हेतर, इतरही कर्मचारी नेमण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडे अनेक अधिकारी अनेकांच्या माध्यमातून फिल्डिंग लावत असले तरी त्यांनी आमचा सगळा स्टाफ वरून येणार असल्याचे सांगत हात वर केले आहेत. रेकॉर्ड तपासूनच आधीची माणसे घेण्याच्या आदेशामुळे आधीच बदनाम झालेल्या अधिकाऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे. त्यामुळे गेल्या आठपंधरा दिवसांत मंत्र्यांकडे पीए, पीएस म्हणून वावरणाऱ्यांपैकी काही जणांना घरी जावे लागू शकते.

Web Title: Ministers will appoint PA, PS only after checking their records; Chief Minister, Deputy Chief Minister gave instructions to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.