मंत्रालयाचे होणार निर्जंतुकीकरण; आजपासून दोन दिवस कामकाज बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:55 AM2020-04-29T05:55:16+5:302020-04-29T05:55:37+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे या काळात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्याच्या प्रशासनाचा गाडा जिथून हाकला जातो ती दक्षिण मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीची वास्तू २९ व ३० एप्रिल अशी सलग दोन दिवस बंद राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे या काळात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करत सार्वजनिक ठिकाणे तसेच कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रालयातील मुख्य इमारत, अनेक्स इमारत व समोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम बुधवार २९ एप्रिल व गुरुवार ३० एप्रिलला होईल. मुख्य आस्थापनांसोबतच आवारातील अन्य आस्थापनांमध्येही हे काम केले जाईल.