मुंबई - मंत्रालयात अकाउंट विभागात पैश्यांची अफरातफर झाल्याने मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अकाउंट विभागात अफरातफर करणारा आरोपी कर्मचारी नितीन साबळे (वय-२८) याला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस तपासात ३२ लाखांची मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि इतर भत्त्याच्या पैश्यांतून झाली असल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयातील अकाउंट विभागात कर्मचाऱ्यांच्या पगार आणि इतर भत्त्याच्या पैश्याची अफरातफर करत कर्मचाऱ्यांचे ३२ लाख रुपये नितीन साबळे या आरोपीने उकळले होते. नितीन साबळे हा मंत्रालयात अकाउंट खात्यात कॅशियर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम करत होता असल्याची माहिती तपास अधिकारी नितीन कदम यांनी दिली. तो मूळचा साताऱ्याचा असून मुंबईतीळ चिंचपोकळी परिसरात तो राहतो. मंत्रालयातील डेस्क अधिकारी किशोर सोईतकर यांनी मंत्रालयात झालेल्या पैश्यांच्या अफरातफरीबाबत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात १५ जून रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर पुरावे गोळा करून २७ जूनला आरोपी नितीन साबळेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने नितीनला १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत ३२ लाखांची नितीनने अफरातफर केल्याचे समोर आले आहे. पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत.