आम्ही मुंबईच्या निवासस्थानी, पंकजा मुंडेंच्या त्या ट्विटवर समर्थकांनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 08:34 AM2021-07-08T08:34:22+5:302021-07-08T08:42:35+5:30
Ministry expand : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी सायंकाळी करण्यात आला. त्यामध्ये 43 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्रातून 4 खासदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे काही माध्यमांनी यासंदर्भातील वृत्तही दिले होते. मात्र, अचानक सकाळपासून भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचं कॅबिनेट मंत्रीपद हुकल्याच्या चर्चा शपथिविधी सोहळ्यानंतर खरी ठरली. दरम्यान, पंकजा मुंडेंनी यासंदर्भात केलेल्या एका ट्विटवरुन भाजपा समर्थकांनी केंद्रीय नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी सायंकाळी करण्यात आला. त्यामध्ये 43 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून महाराष्ट्रातून 4 खासदारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेल्या प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. अनेकांनी हा भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचं म्हटलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी प्रितम मुंडे दिल्लीला गेल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दाखवल्या होत्या. याबाबत पंकजा मुंडेंनीच स्पष्टीकरण दिलंय.
खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2021
पंकजा मुंडेंनी ट्विट करुन, खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतमताई व आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत, असे सांगितले होते. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर टीका केली आहे. तसेच, भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर पडल्याचेही म्हटले आहे. काहींनी तर आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगत, भाजपातून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. तर, प्रीतम मुंडेंचं काय चुकलं? असा सवालही अनेकांनी विचारला आहे.
महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच राजकारण सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेते नारायण राणे, कपिल पाटील आगरी समाजाचे आणि वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराड यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.
भाजपला ओबीसी चेहऱ्याचा विसर पडला
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान (Cabinet Expansion) न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो या मंत्रिमंडळात नाही आहे, असे शेंडगेंनी म्हटले.