अल्पवयीन मुलीला उलटी चाटण्यास सांगितले!
By admin | Published: May 31, 2017 04:42 AM2017-05-31T04:42:57+5:302017-05-31T04:42:57+5:30
बाथरुममध्ये उशीर झाल्याने महिला कर्मचाऱ्याने एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता तिने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाथरुममध्ये उशीर झाल्याने महिला कर्मचाऱ्याने एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता तिने केलेली उलटी चाटण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मानखुर्द बालसुधारगृहात घडला.
ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलेविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समाजातील अनाथ, वंचित, गतीमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृह आहेत. मानखुर्द बालसुधागृहातील अतिरिक्त बालगृहात हा प्रकार घडला. आठ वर्षांची मुलगी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाथरुममध्ये गेली होती. तिला बाथरुममधून बाहेर पडण्यास उशीर झाल्याने व्यवस्थापिका संगीता पवार यांनी तिला मारहाण केली. मारहाणीनंतर मुलीने तेथेच उलटी केली. पवार यांना हे समजताच त्यांनी तिला उलटी साफ करण्यास सांगितले. मात्र तिने नकार देताच पवार यांनी मुलीला उलटी चाटण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजातच त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.