मुंबई : मागील पाच महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी ५०७ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यापैकी ४४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. गेल्यावर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे एक हजार १५७ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंतच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अपहरणाच्या घटनांबरोबरच यातील बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून पसार होत आहेत. तर, काहींना फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. तर, काही प्रकरणांत क्षुल्लक कारणांमुळे घर सोडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
४४२ गुन्ह्यांची उकल -
पाच महिन्यांत मुंबईतून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे ५०७ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी ४४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत ५१५ गुन्हे नोंद झाले होते.
गेल्या वर्षी हजारो मुली गायब -
गेल्या वर्षभरात एक हजार १५७ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी एक हजार ८७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षभरात हजारो मुली बेपत्ता झाल्या. पोलिसांकडून महिलांसंबंधित गुन्ह्यांचा तत्काळ शोध घेण्यात येतो. तर, उर्वरित ७० गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
१) जूनमध्ये घडलेल्या घटनेत वडील ओरडतात म्हणून अंधेरीतून भावंडांसह बेपत्ता झालेल्या चार भावंडांना मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आले.
२) मुलींनी स्वतःहून एका आश्रमात अर्ज करत लेखी अर्ज देऊन तेथे राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केल्याचे समोर आले. अंधेरी परिसरात राहणाऱ्या ११ वर्षांच्या मुलासह १८, १५,आणि ८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली.
३) या मुलांनी सावत्र आईसह २६ मे रोजी घर सोडले. त्यानंतर, आई मध्य प्रदेश येथील खांडवा रेल्वे स्थानकात उतरून माघारी आली. २८ मे रोजी सावत्र आई एकटी घरी परतल्यानंतर मुले निघून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू करत मुलांना सुखरूप मुंबईत आणले.