Join us

संसारातील किरकोळ भांडणे क्रूरता नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:18 AM

Court News : संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, केवळ एवढ्याशा कारणावरून संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही

नागपूर  संसार करताना पत्नी किरकोळ भांडणे करीत असेल आणि पतीचे म्हणणे ऐकत नसेल तर, केवळ एवढ्याशा कारणावरून संबंधित पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला व पतीची घटस्फोट मिळण्याची विनंती अमान्य केली.हिंदू विवाह कायद्यानुसार, पती किंवा पत्नीचे वागणे त्यांना एकमेकांसाेबत राहणे अशक्य करणारे असेल तरच, ते वागणे क्रूरतेमध्ये मोडते. संसार करताना होणाऱ्या सामान्य स्वरूपाच्या वादांना क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. अकोला येथील राजीवने पत्नी दीपालीची वागणूक क्रूरतापूर्ण असल्याचा आरोप करून घटस्फोट मागितला होता.राजीवने सुरुवातीला कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली होती. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी ती याचिका खारीज झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

टॅग्स :न्यायालय