Join us

चांदिवलीत अल्पसंख्याक मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:36 AM

काँग्रेसचे वर्चस्व; नशीब अजमाविणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या उमेवाराचा कस लागणार

- सचिन लुंगसे मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील चांदिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विशेषत: नसीन खान यांचे वर्चस्व आहे. २००९ आणि २०१४ अशा दोन्ही विधानसभा निवडणुकींत काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारास धूळ चारली आहे. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकींत शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी येथे आपआपले नशीब आजमावले. मात्र काँग्रेसपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दोन्ही निवडणुकांत मिळालेल्या मतांची बेरीज केली तरीदेखील काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या पुढे हा आकडा जात नाही. परिणामी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत येथे आपले नशीब आजमाविणाºया प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेवाराचा काँग्रेससमोर कस लागणार आहे.२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता काँग्रेसने नसीम खान यांना उमेदवारी दिली होती. मनसेने दिलीप लांडे यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने चित्रा सांगळे यांना उमेदवारी दिली होती. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली विधानसभा मतदारसंघातून नसीम खान हे विजयी झाले होते. नसीम खान यांना ८२,६१६ मते मिळाली होती. दिलीप लांडे यांना ४८,९०१ मते मिळाली होती. चित्रा सांगळे यांना २२,७८२ मते मिळाली होती. या वेळी १,५९,९७२ मतदारांनी मतदान केले होते; आणि नसीम खान हे ३३,७१५ मताधिक्यांनी विजयी झाले.२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता काँग्रेसने नसीम खान यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेने संतोष रामनिवास सिंग यांना उमेदवारी दिली होती. मनसेने ईश्वर दयाराम तावडे यांना उमेदवारी दिली होती. एस. अण्णामलाई अपक्ष होते. २०१४ साली नसीम खान यांना ७३,१४१ मते मिळाली. २०१४ सालीही चांदिवली विधानसभा मतदारसंघातून नसीम खान यांचाच विजय झाला. मात्र २००९ च्या विधानसभेच्या तुलनेत २०१४ साली खान यांची मते सुमारे ९ हजारांनी घटली. शिवसेनेचे उमेदवार संतोष सिंग यांना ४३,६७२ मते मिळाली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ साली शिवसेनेची मते सुमारे २१ हजारांनी वाढली. मनसेचे उमेदवार ईश्वर तायडे यांना २८,६७८ मते मिळाली. २००९ च्या तुलनेत २०१४ साली मनसेची मते २० हजारांनी घटली. अण्णामलाई यांना २०,२६६ मते मिळाली.मुळात चांदिवली या विधानसभा मतदारसंघातील पवई हा परिसर वगळता उर्वरित क्षेत्रातील लोकवस्तीही सर्वसामान्य स्तरातील आहे. पवई येथील वस्ती उच्चभ्रू आहे. चांदिवली विधानसभा क्षेत्रात नागरी समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले असून, लोकप्रतिनिधी म्हणून येथील नगरसेवक, आमदार आणि खासदार हे त्या समस्या सोडविण्यात कमी पडले आहेत. सर्वांत मोठी समस्या म्हणजे कुर्ला-अंधेरी रस्त्यांचे रुंदीकरण. हा मार्ग रुंद झाला तर अर्ध्या मुंबईतली वाहतूककोंडी कमी होईल. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हा मार्ग रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरे म्हणजे या विधानसभा मतदारसंघातील अर्धाअधिक परिसर हा विमानतळ प्राधिकरणाच्या क्षेत्रात आहे. या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन कित्येक वर्षांपासून रेंगाळले असून, प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विमानतळावरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा गाजला आहे; आणि तिसरा म्हणजे येथे दरडीवरील झोपड्यांची संख्या अधिक असून, त्यांच्या सुरक्षेसह पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आहे. या तिन्ही प्रकरणांत रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. जर का येथील रहिवाशांचे पुनर्वसन झाले तर आपले मतदार कमी होतील, या भीतीपोटी अनेक लोकप्रतिनिधींच्या पोटात गोळा येत आहे. विशेषत: कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर, सहयोग नगर, संदेश नगर, जरीमरी या परिसरातील रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. नाही म्हटले तरी कित्येक हजार रहिवासी स्थलांतरित झाले तर मतदार कमी होतील, अशी भीती उमेदवारांना आहे. मतदार हे अल्पसंख्याक असून, या अल्पसंख्याक मतदारांचा कौल भावी आमदार ठरविणार आहेत. चांदिवलीतून काँग्रेसकडून नसीम खान यांचेच नाव आघाडीवर आहे. शिवसेनेकडून दिलीप लांडे यांचे नाव आघाडीवर आहे.राजकीय चर्चाराजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शिवसेना-भाजप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. जर युती झाली नाही, तर भाजपकडून येथे उत्तर भारतीय उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहित भारतीय आणि राजहंस सिंह यांची नावे येथे चर्चेत आहेत. जर का या दोघांपैकी एकाला येथे उमेदवारी मिळाली तर त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :नसीम खानकाँग्रेसशिवसेनाभाजपामनसे