मिनीट्रेनचे इंजिन कुर्ला वर्कशॉपमध्ये
By admin | Published: May 17, 2017 02:10 AM2017-05-17T02:10:44+5:302017-05-17T02:10:44+5:30
नेरळ-माथेरान मिनीट्रेनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच ताफ्यात आलेले मिनीट्रेनचे एक नवीन इंजिन
- अजय कदम। लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : नेरळ-माथेरान मिनीट्रेनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच ताफ्यात आलेले मिनीट्रेनचे एक नवीन इंजिन दुरु स्तीच्या कामासाठी कुर्ला वर्कशॉप येथे सोमवारी रात्री रवाना करण्यात आले. मात्र, कुर्ला वर्कशॉपच्या अभियंत्यांनी बनविलेले हे इंजिन किरकोळ बदल करण्यासाठी नेरळ येथून पाठविले आल्याचे सांगितले जात आहे.
मिनीट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेने जेवढा मार्ग तयार आहे, त्या भागात दुरुस्तीचे साहित्य नेण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत नेरळपासून पुढे १० किलोमीटर लांबीचा नॅरोगेज ट्रॅक तयार झाला आहे. अशा वेळी पुन्हा एक नवीन इंजिन दुरुस्तीसाठी कुर्ला येथे न्यावे लागत आहे.
एनडीएम१-४0२ हे इंजिन रेल्वेने एअर ब्रेक प्रणाली बसविण्यासाठी हलविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी किरकोळ बदलांसाठी ते हलविण्यात आल्याचे माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी नेरळ-माथेरान मिनीट्रेन एअर ब्रेक प्रणालीवर चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गतवर्षी बनविण्यात आलेली तीनही नवीन इंजिन्स त्याच पद्धतीने बनविण्यात आली आहेत. त्यामुळे नेरळ लोकोमधील कर्मचाऱ्यांचे हे सांगणे चुकीचे असल्याचे काही जुन्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण नव्याने बनविलेले हे इंजिन काही दिवसांपूर्वी नेरळ येथून जुम्मापट्टी या दरम्यान रुळावरून घसरले होते.
जून २०१७ मध्ये मिनीट्रेन पुन्हा रुळावर येणार असताना, मिनीट्रेनच्या ताफ्यातील सर्व इंजिन्स सक्षम असावी, यासाठी सोमवारी मध्यरात्री हे इंजिन नेरळ येथून कुर्ला वर्कशॉपमध्ये रवाना करण्यात आले आहे.
२०१६ पासून ट्रेन बंद
- जानेवारी २०१६ मध्ये एनडीएम१-४०१ हे इंजिन नेरळ लोकोमध्ये पोहोचले, त्यानंतर आणखी दोन इंजिन्स नेरळ -माथेरान मिनीट्रेनसाठी नेरळ लोकोमध्ये पोहचली आहेत.
- मिनीट्रेनचे डबे रु ळावरून घसरल्याने ९ मे २०१६ पासून मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कुर्ला वर्कशॉपमधील अभियंत्यांनी तयार केलेली इंजिन्स प्रवाशांच्या सेवेत आलेली नाहीत.