मिनीट्रेनची शटल सेवा लवकरच
By Admin | Published: May 23, 2016 03:02 AM2016-05-23T03:02:42+5:302016-05-23T03:02:42+5:30
नॅरोगेजवर धावणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन कोणत्याही स्थितीत बंद पडू देणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली .
नेरळ / माथेरान : नॅरोगेजवर धावणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन कोणत्याही स्थितीत बंद पडू देणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली . हेरिटेजच्या नामावलीत असलेल्या मिनीट्रेनची अमनलॉज - माथेरान शटल सेवा लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिले आहे. माथेरान नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्र्यांना पर्यटन व्यवसायासाठी मिनीट्रेनचे महत्व सांगितले.
८ मे रोजी नेरळ- माथेरान ही घाट सेक्शनमध्ये धावणारी मिनीट्रेन रेल्वे विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करून बंद केली. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून मिनीट्रेन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन मिनीट्रेन माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी किती महत्वाची आहे, याचे विवेचन त्यांनी १० मे रोजी दिल्ली येथे जाऊन केले. त्याचदिवशी माथेरानमधील सर्व राजकीय पक्ष आणि ग्रामस्थ यांनी रस्त्यावर उतरून, कडकडीत बंद पाळून आवाज उठविला. त्यानंतर नेरळ येथील लोको मध्ये इंजिनाच्या दुरु स्तीची कामे तसेच नॅरोगेज ट्रॅकवर दुरु स्ती सुरु केली. तरी देखील कोणतीही हालचाल दिसत नसल्याने माथेरानमधील राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा यांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.
खा. बारणे आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याने रेल्वेमंत्रालयाने २० मे रोजी रात्री प्रसिध्दीपत्रक काढले. नेरळ-माथेरान मिनीट्रेन कोणत्याही स्थितीत बंद करण्याचा रेल्वेचा हेतू नसल्याचे देखील रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
शटल सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी एअरब्रेक सेवा असलेले तीन नवीन इंजिन आणि १० डबे खरेदी केले जाणार असून या सेक्शनमध्ये अपघात विरहित प्रवास व्हावा यासाठी सुरक्षेचे कारणास्तव ६५० मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधल्या जातील असे जाहीर केले आहे. संपूर्ण कामासाठी ३५ कोटी खर्च अपेक्षित असून राज्य सरकार खर्चाचा भार उचलेल, अशी ग्वाही त्यानंतर देण्यात आली आहे. लवकरच सुरक्षाविषयक चाचणी पूर्ण झाल्यानंतर मिनीट्रेनची शटल सेवा कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)