खारीगावातील ग्रामस्थांच्या वापरातील रंगमंच व हॉलला पालिकेने पोलीस बंदोबस्तात ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 04:40 PM2018-09-02T16:40:41+5:302018-09-02T16:41:16+5:30
धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा, पेणकरपाडा मधील समाज मंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांना सुध्दा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे.
धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच व हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजी - माजी तब्बल ९ नगरसेवक असुनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या शिवाय धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा, पेणकरपाडा मधील समाज मंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांना सुध्दा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे. बाजार भावा प्रमाणे भाडे आकारण्यासाठी पालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे.
भार्इंदर पुर्वेच्या खारीगावात स्थानिक आगरी समाजाचे सत्यनारायण मंदिर आहे. जवळच महापालिकेच्या नगरसेवक निधीतून या ठिकाणी रंगमंच व एकमजली छोटा हॉल बांधण्यात आलेला आहे. रंगमंचाचा वापर गावातील यात्रा वा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी केला जातो. लहान हॉल विविध कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ उपयोगात आणतात. अनेक वर्षां पासुन सत्यनाराण मंदिर ट्रस्टच्या ताब्यात सदर मालमत्ता आहे.
शुक्रवारी महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात लहान हॉलला सील ठोकले आहे. रंगमंच मोकळा असला तरी त्याला सुध्दा प्रातिनिधीक सील ठोकले आहे. कारवाईवेळी माजी नगरसेवक शशीकांत भोईर सुध्दा उपस्थित होते. गावातले विद्यमान ४ व माजी ५ असे ९ आजी - माजी नगरसेवक असताना सील ठोकल्यामुळे गावात अस्वस्थता पसरली आहे. तर सदर जागा पालिकेच्या मालकीची नसुन ग्रामस्थांची आहे. पालिकेने नगरसेवक निधीतून बेकायदा बांधकाम केले आहे. या विरोधात कायदेशीर लढा देण्यास आपण समर्थ आहोत, असं माजी सभापती तथा सत्यनारायण मंदिराचे ट्रस्टी मोहन पाटील यांनी सांगीतले.
दरम्यान, पालिकेने आपल्या मालमत्ता ह्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे भाड्याने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सदर मालमत्ता भाड्याने देण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या होत्या. पण पालिकेच्या अवास्तव भाड्याच्या मागणीमुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर मालमत्ता कुठल्याही संस्थेकडे दिलेल्या नसल्याने पालिकेने कारवाई सुरु केली आहे .
मुळात बहुतांशी मालमत्तांचा वाणिज्य वापरच होत नसून सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा व व्यायामशाळासाठी त्याचा वापर केला जातोय. आंबेडकर नगर येथे समाजमंदिरात कुस्तीचा आखाडा अनेक वर्ष सुरु आहे. तर अनेक ठिकाणी व्यायामशाळा चालवल्या जात आहेत. बहुतांश जागांची मालकीच पालिकेची नसताना ही बांधकामे केली गेली आहेत. आणि पालिका आता सदर मालमत्ता आपली असल्याचा दावा करत आहे. सदर मालमत्ता ह्या स्थानिकांच्या वापरात असुन त्यांना हुसकावून लावण्याचा घाट पालिकेने कोणाच्या इशाऱ्यावरुन घातलाय ? असा सवाल ग्रामस्थ करु लागले आहेत.
शासन आदेशा नुसार पालिकेच्या मालमत्ता रेडीरेकनरच्या दराने भाड्याने देणे बंधनकारक आहे. पण भाड्याने घेण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्याने आदेशानुसार पालिकेने मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सील ठोकण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
-दिपक खांबित, पालिकेचे कार्यकारी अभियंता