मीरा-भाईंदर पालिकेत दोन दिवसांत पावणे कार कोटींचा कर जमा
By admin | Published: November 11, 2016 06:36 PM2016-11-11T18:36:13+5:302016-11-11T18:36:13+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेने १० नोव्हेंबरपासून कर वसुलीला सुरुवात केल्यानंतर दोन दिवसांत पावणे चार कोटींचाविक्रमी कर जमा झाल्याचे निदर्शनास आले.
Next
>ऑनलाइन लोकमत/राजू काळे
भाईंदर, दि. 11 - मीरा-भाईंदर महापालिकेने १० नोव्हेंबरपासून कर वसुलीला सुरुवात केल्यानंतर दोन दिवसांत पावणे चार कोटींचाविक्रमी कर जमा झाल्याचे निदर्शनास आले.
केंद्र सरकारने चलनात असलेल्या हजार, पाचशेच्या नोटा ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजल्यानंतर अचानक बंद झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पालिकेने इतर नोटांखेरीज बंदी घालण्यात आलेल्या नोटांद्वारे होणारी कर वसुली बंद केली. त्यामुळे पालिकेच्या थकीत करासह चालू वर्षातील कर वसुलीच्या महसुलावर पाणी फेरले होते. १० नोव्हेंबरला राज्य सरकारने त्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढल्यानंतर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सायंकाळी साडेपाच वाजता कर वसूलीला सुरुवात केली. रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कर वसुलीतून पालिकेला सुमारे ७२ लाखांचा महसूल मिळाला. यानंतर प्रशासनाने ११ नोव्हेंबरला सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर वसुली सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. या दिवशी सकाळपासूनच करदात्यांनी कर भरण्यासाठी पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रासह सहा प्रभाग कार्यालयात रांगा लावण्यास सुरुवात केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे तीन कोटींची कर वसुली झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कर वसुलीसाठी केंद्रातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात येऊन केवळ कर वसुलीला प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी एकूण ८ खिडक्या सुरु करण्यात आल्या. त्यातील ७ खिडक्यांवर रोख रक्कमा स्वीकारण्यात येत होत्या. कर वसुलीसाठी पालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपण्यात आले होते. एरव्ही प्रत्येक चालू वर्षाच्या कर वसुलीसाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते. ती यंदा हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने विनासायास तसेच विक्रमी झाल्याचे स्पष्ट झाले.