Join us

सायकल फेरी वरून परतताना हरवलेल्या मुलांची आईशी घालून दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 8:01 PM

बोरिवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी विरार लोकलमध्ये असलेल्या मुलांना ओळखून सोबत घेतले आणि आईची भेट घडवून दिली. 

मीरारोड - जनजागृतीसाठी मीरारोड ते गेटवे ऑफ इंडिया अशी सायकल फेरी करून येताना लोकलने परतत असताना आईची तिच्या हरवलेल्या ४ लेकरांशी भेट घडवून आणण्याचे काम मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी केले . 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बुधवारी प्रजासत्ताकदिनी मास्क व हेल्मेटचा वापर बाबत जनजागृती करण्यासाठी मीरा भाईंदर, - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त विजयकांत सागर,  सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पोलीस निरीक्षक राहूलकुमार पाटील, उपनिरीक्षक उज्वल आरके व सुहेल पठाण, पोलीस कर्मचारी शंकर उथळे, सोमनाथ चौधरी, प्रविण बंगाळे ह्यांनी मीरारोड पासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत सायकलने  प्रवास केला . 

सायकल फेरी संपल्या नंतर उपनिरीक्षक उज्वल लोकल पकडून परत येत असताना अंधेरी रेल्वे स्थानकात दोन महिला ह्या डब्यात भांबावलेल्या अवस्थेत चढल्या . उपनिरीक्षक उज्वल यांनी महिलेस विचारणा केली असता तिने तिचे नाव सोनी धर्मेंद्र सिंग असून सोबत आपली सासू आहे . माझे ३ मुलगे व १ मुलगी ह्यांना अंधेरी वरून लोकल डब्यात बसवले पण आम्ही दोघी गर्दी असल्याने चढू शकलो नाही व विरार लोकल निघून गेल्याचे सांगितले. 

त्या दोघीनांही रेल्वे बाबतची फारशी माहिती नव्हती आणि त्या रडत  होत्या . उज्वल यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात घडल्या प्रकारची माहिती दिली . रेल्वे पोलिसांनी तात्काळ सर्व रेल्वे स्थानका वरील पोलिसांना पालका विना प्रवास करणाऱ्या चौघा मुलांची माहिती कळवली . बोरिवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी त्या विरार लोकल मध्ये असलेल्या मुलांना ओळखून सोबत घेतले .  अनुराग सिंग (११),  अनुपम सिंग (८), अनुजसिंग (६) व प्रगती सिंग (५) अश्या ह्या चारही अल्पवयीन मुलांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले . मुलं सुखरूप सापडल्याने आई सोनी ह्यांनी सर्व पोलिसांचे आभार मानले . 

टॅग्स :मुंबईमीरा रोडमीरा-भाईंदरवसई विरार