लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता खाजगी मोबाईलने छायाचित्र काढून नव्हे तर ई-चलन यंत्रणेद्वारे छायाचित्र काढून कारवाई करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वाहतूक पोलिसांनी आणखी ६० इ-चलन यंत्रांची मागणी केली आहे. मोटार वाहन कायद्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवरील दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मीरा भाईंदर वाहतूक शाखेकडे सध्या ६० ई-चलन यंत्र आहेत, तर १०४ वाहतूक पोलीस व ६ अधिकारी सध्या कार्यरत आहेत. शासन आदेशानंतर वाहतूक शाखेला वरिष्ठांनी ई-चलन यंत्राद्वारेच कारवाई करण्यास सांगितले आहे.
अनेकवेळा यंत्र नसल्याने मोबाईलमधून वाहन व चालकाचे छायाचित्र घेतली जात होती. पण आता ई-चलनाव्यतिरिक्त कारवाईसाठी मोबाईलमधून छायाचित्र काढल्यास वाहतूक पोलिसावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांची संख्या पाहता सध्या असलेल्या ६० ई-चलन यंत्र कमी पडत असल्याने आणखी ६० ई-चलन यंत्रांची मागणी वाहतूक शाखेने वरिष्ठ स्तरावर केली आहे.