मीरा रोड - मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रोची सेवा हवी, पोकळ आश्वासने नकोत, कृती हवी, अशी मागणी करत नागरिक अधिकार मंचने ‘नो मेट्रो नो व्होट’ आंदोलन सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी दहिसरपर्यंतची मेट्रो मीरा-भार्इंदरपर्यंत नेण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आता सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरू केली असली तरी, जोवर काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मंचने घेतली आहे. मीरा रोड व भार्इंदरवासीयांना कामधंद्यांसह शिक्षण तसेच वैयक्तिक कारणांसाठी मुंबईला जाण्यास लोकलशिवाय पर्याय नाही. हा प्रवास त्रासदायक ठरतो. रस्त्यामार्गे जायचे तर दहिसर चेकनाका येथून मोठ्या वाहतूककोंडीतून वेळ, पैसा व इंधन वाया घालवून प्रवास करावा लागतो. मुंबई मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईच्या दहिसर व ठाण्याच्या कासारवडवलीपर्यंत असलेल्या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण करून ती मीरा-भार्इंदरला जोडण्याची मागणी तत्कालीन आ. मुझफ्फर हुसेन, तत्कालीन खा. संजीव नाईक, आ. प्रताप सरनाईक आदींनी सातत्याने केली होती. गेल्या वर्षी मीरा रोडमधील पालिका कार्यक्रमातदेखील स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर गीता जैन यांनी केलेल्या मागणीवर मीरा-भार्इंदर मेट्रोने जोडण्याची जाहीर ग्वाही दिली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांना मेट्रोच्या पडलेल्या विसरानंतर याच आजी माजी आमदार - खासदारांनी मेट्रोची मागणी लावून धरली. केवळ काशिमिऱ्यापर्यंत नको, तर मीरा-भार्इंदरमध्येदेखील मेट्रो हवी, अशी मागणी करत गेल्या तीन महिन्यांपासून विविध संघटनांनी नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून ‘नो मेट्रो नो व्होट’ मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून सत्ताधाऱ्यांची पंचाईत होऊ लागली. नागरिक अधिकार मंचच्या माध्यमातून महापौर, आमदार आदींसह महापालिकेतील जवळपास सर्वच नगरसेवकांना भेटून मेट्रोसाठी विशेष महासभा बोलवून ठराव करण्याची मागणी चालवली. शहरातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांनादेखील लेखी निवेदने दिली. शहरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, प्रमुख नाके, सार्वजनिक रहदारी व गर्दीच्या ठिकाणांसह सण-उत्सवांमध्येदेखील ‘नो मेट्रो नो व्होट’ची जनजागृती व स्वाक्षरी अभियान चालवण्यात आले. मंचच्या निवेदनावर भार्इंदर पश्चिम, प्रभाग समिती क्र.१ चे सभापती आसीफ शेख यांनीही लेखी पत्राद्वारे एमएमआरडीएकडे मीरा-भार्इंदरकरांना मेट्रो व रोपवेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने एमएमआरडीएच्या के. विजयालक्ष्मी यांनी शेख यांना लेखी पत्रद्वारे दहिसरपर्यंतची मेट्रो मीरा-भार्इंदरपर्यंत विस्तारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदरकरांचे मेट्रोसाठी आंदोलन सुरूच
By admin | Published: November 15, 2016 4:28 AM