स्टंट करताना सायकलवरुन नियंत्रण सुटलं अन्...भिंतींवर आदळल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:05 PM2024-11-01T16:05:22+5:302024-11-01T16:09:11+5:30
सायकल भिंतीवर आदळल्याने मिरारोड येथील एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mira Road Accident : मुंबईच्या मिरारोड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायकलवर स्टंट करत असताना एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. सायकलवर स्टंट करताना भितींवर डोकं आपटल्याने मुलाचा मृत्यू झाला. हा सगळा धक्कादायक प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.अल्पवयीन मुलगा घोडबंदर किल्ला येथे पर्यटनासाठी आलेला असताना हा प्रकार घडला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. सीसीटीव्हीमध्ये मुलाचे डोके भिंतीवर आदळताना दिसत आहे.
मिरारोड येथे सायकल स्टंट करताना झालेल्या विचित्र अपघातात एका अल्पवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागला. मीरा-भाईंदरमधील एका रस्त्याच्या उतारावर भरधाव वेगाने सायकल चालवत असताना भिंतीला आदळून १६ वर्षीय नीरज यादवचा मृत्यू झाला. जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमधून ही घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळ राहणारा नीरज सोमवारी सायकलवरून घोडबंदर किल्ल्यावर गेला होता. उतारावरून वेगाने सायकल चालवत असताना त्याचा सायकलवरील ताबा सुटला आणि एका घराच्या गेटजवळील भिंतीवर त्याचे डोकं आदळलं.
नीरज यादव हा घोडबंदर किल्ला परिसरात सोमवारी सकाळी ११ च्या सुमारस सायकलवरुन फिरायला गेला होता. त्यावेळी तीव्र उताराच्या रस्त्यावर नीरजचा सायकलवरून ताबा सुटला आणि तो समोरील घराच्या गेटजवळील भितींवर जाऊन धडकला. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी नीरज जवळ धाव घेतली. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांनी नीरजला उपचारासाठी भाईंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकिय रूग्णालयात नेले होते.मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.