पित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:34 PM2018-07-18T18:34:30+5:302018-07-18T18:36:56+5:30

1.7 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

in miraroad doctor removes biggest tumor from Gall bladder | पित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद

पित्ताशयातील सर्वात मोठी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश; गिनिज बुकमध्ये होणार नोंद

googlenewsNext

मीरारोड : मीरा रोड येथील एका खाजगी रुग्णालयात पित्ताशयामधील सर्वात मोठी गाठ काढण्यात यश आलं असून संपूर्ण जगामध्ये हा आठवा रुग्ण असण्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. पित्ताशयामधील ही गाठ ३६.५७ सेमीची असून तिचे वजन १.७ किलो आहे. यापूर्वी अशा प्रकारची ३० सेमीची गाठ २०१६ साली जयपूर येथील एका रुग्णाच्या पित्ताशयातून  काढण्यात यश आलं होतं. 

भाईंदर येथे राहणारे ५८ वर्षीय गिरीश माने यांना २५ वर्षांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. गॅस, अपचन अथवा जंतुसंसर्ग असेल म्हणून त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे अनेक वेळा उपचार केलं. परंतु या उपचारांनी कोणताही फरक पडला नाही. २० वर्षांपूर्वी सोनोग्राफी केली असता, त्यांच्या पित्ताशयाला थोडीशी सूज असल्याचं समोर आलं. परंतु माने यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. गेल्या महिन्यात पोटामध्ये जास्तच दुखायला लागल्यामुळे त्यांनी मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात पोट व आतड्यांचे शल्य विशारद डॉ. इमरान शेख यांची भेट घेतली. डॉ इमरान  शेख यांनी वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करायचं ठरवलं. त्यांनी माने यांना सिटी स्कॅन करण्याचाही सल्ला दिला. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या पोटामध्ये एक मोठी गाठ दिसून आली. परंतु ही गाठ नेमकी कुठे आहे, याचा उलगडा एमआरआय केल्यानंतर झाला. 

पोटातील सर्वात महत्वाचा अवयव असलेल्या पित्ताशयामध्ये एक मोठी गाठ दिसून आली. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते. त्याला पित्ताशय (Gall bladder) असं म्हणतात. यामध्ये जास्त तयार झालेलं पित्त साठवून ठेवलं जातं आणि प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्न पचनासाठी ते पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात सोडलं जातं. ही गाठ एवढी मोठी झाल्यामुळे पित्ताशयाचा आकार वाढून १ फूट २ इंच म्हणजेच ३६ सेमी झाला होता. सर्वसाधारण आपल्या शरीरातील पित्ताशयाचा आकार हा ५ ते ६ सेमी असतो. 

याविषयी अधिक माहिती देताना डॉ इमरान शेख म्हणाले, "आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या आकाराची पित्ताशयातील गाठ संपूर्ण जगामध्ये कोठेही आढळून आलेली नाही. गिरीश माने यांच्या पोटामध्ये ही गाठ २५ वर्षे जुनी असून या गाठींमुळे यकृत, मोठे व छोटे आतडे तसेच किडनीवर ताण पडून त्यांच्या पोटात दुखत होते. परंतु गेली २५ वर्षे माने हे पेनकिलर घेऊन त्यावर उपचार करत होते. माने यांचे नशीब बलवत्तर होतं, त्यामुळे ही गाठ पोटात फुटली नाही. जर ही गाठ पोटामध्ये फुटली असती, तर त्यांना मृत्यूचा धोका होता. 

रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आम्ही ही गाठ व पित्ताशय यशस्वीरित्या काढू शकलो. या गाठीचं वजन १. ७ किलो होते व त्यामध्ये ३७० मिलीलीटर पाणी (दूषित द्रवपदार्थ) होतं. ५ ते ६ सेमी आकाराच्या पित्ताशयामध्ये २५ मिली लिटरपेक्षा जास्त पाणी राहत नाही. परंतु या केसमध्ये सर्वसाधारण मर्यादेपेक्षा जास्त पाणी आढळलं. हा सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एका नवा विक्रमच आहे. आम्ही ही वैद्यकीय केस लिम्का बुक व गिनीज बुकमध्ये नोंदणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."
 

Web Title: in miraroad doctor removes biggest tumor from Gall bladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.