राष्ट्रवादीचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल चंद्रकांत भुसारा यांच्यासोबत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुसारा यांनी स्वत: कुलाबा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा आदिवासी उपाययोजना सन २०२३-२४ राज्य स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आदिवासी विकास विभागाचे सचिव व्यास, आमदार राजेश पाटील, निकोले, श्रीनिवास वनगा आदी उपस्थित होते.
यावेळी भुसारा यांनी या बैठकीपूर्वी जिल्हा निहाय राज्य स्तरीय बैठक घेवून त्याचा आढावा घेतला असता तर आम्हाला देखील बैठकीचे नियोजन करता आले असते, अशी सूचना केली. यावर जिल्हाधिकारी बोडके यांनी मला कोणालाही विचारण्याची गरज नाही, तसेच तुम्हालाही मला विचारण्याची गरज नाही. मला जे कळते ते मी केले आहे, असे उत्तर दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी, आदिवासी आमदारांशी गैरवर्तन केले आहे, असा आरोप भुसारा यांनी केला आहे.
बोडके यांचे हे वागणे माझ्याशी गैरवर्तन तसेच मला मानहानी करण्याच्या उद्देशाने असून कोणत्याही पद्धतीच्या राजशिष्ठाचाराचे पालन न करता अरेरावीची भाषा वापरली आहे. संबंधिताविरोधात आदिवासी अॅक्ट १९८९ नुसार अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी भुसारा यांनी केली आहे.