मनीषा म्हात्रेमुंबई : पदरात पाचही मुलीच. यातील मोठ्या मुलीसाठी बड्या उद्योगपतीकडून मागणे आले. वडिलांनी तिच्या सुखी संसाराचे स्वप्न रंगवले. मात्र, साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाने १० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी होकार देत, ४ लाख ४० हजार रुपये रोख, तर तब्बल सहा लाखांचे दागिने तिला लग्नात दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच उरलेल्या रकमेची मागणी करत नवºयासह सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. छळाने परिसीमा गाठली आणि अमानुष मारहाणीत अडीच महिन्यांच्या त्या गर्भवतीचा गर्भपात झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली.एवढे करूनही पती आणि सासरचे नरमले नाहीत. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास पतीचा दुसरा विवाह करून देण्याची धमकी तिला दिली. डॉक्टरांकडे उपचार घेऊन सासरी परतणार तोच सासरच्या मंडळींनी स्वीकारच न केल्याने अखेर या विवाहितेने पोलिसांत धाव घेतली आणि उच्चभ्रू वसाहतीतील हुंड्यासाठी होत असलेल्या छळाचे धक्कादायक वास्तव समाजासमोर आले.दहिसर पूर्व परिसरात आई-वडील आणि चार बहिणींसोबत २९ वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. सुरज शर्मासोबत ५ मे २०११ रोजी तिचा विवाह झाला. लग्नानंतर ती नवºयासोबत पुण्यातील आकुर्डी भागात राहण्यास गेली. हुंड्याच्या उर्वरित ५ लाख ६० हजार रुपयांसाठी सासरच्यांनी नेहाकडे तगादा लावला. मारहाण सुरू झाली. तिने याबाबत वडिलांना सांगितले. मात्र, आणखी ४ मुलींच्या लग्नाचा खर्च असल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.अशातच नेहा गर्भवती राहिली. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सुधारेल, असे नेहाला वाटले. डिसेंबर २०१२ मध्ये नेहा अडीच महिन्यांची गर्भवती होती. या अवस्थेतही तिचा हुंड्यासाठी छळ सुरू होता. त्रास अनावर झाल्याने तिने सासूला प्रत्युत्तर दिले. याच रागात सासरा आणि दिराने तिला शिवीगाळ केली. पतीने थोबाडीत मारून तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला. तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचे सांगितले. अशात बदनामी होऊ नये म्हणून सासरच्यांनी याबाबत कुणाकडे वाच्यता करू नये म्हणून बजावले.थेट घटस्फोटाची मागणी२०१७ मध्ये बाहेर जायचे असल्याचे सांगून सासरच्यांनी नेहाला माहेरी सोडले. त्यानंतर ते परतलेच नाहीत. पतीने १७ मार्च २०१८ रोजी थेट घटस्फोटाचा मागणी अर्ज पाठविल्याने तिला धक्काच बसला. तिने सासरी धाव घेतली. याबाबत जाब विचारताच तिला दमदाटी, मारहाण करून घराबाहेर काढले. तिने पोलिसांची मदत घेतली. माहेरच्यांना समजताच तिला मुंबईत आणले.अत्याचार, अपमान सहन करूनदेखील नेहाच्या कुटुंबीयांकडून सासरच्या मंडळींना समाजविणे सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने घरात रडत बसण्यापेक्षा नेहाने २७ मे रोजी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शर्मा कुटुंबीयांविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१० लाखांच्या हुंड्यासाठी केला सुनेचा गर्भपात, उच्चभ्रू वसाहतीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:29 AM