मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो ३ भुयारी प्रकल्पातील भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबत दिशाभूल करण्यात येत असून त्याला रहिवाशांनी बळी पडू नये, असे आवाहन मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांंनी केले आहे.मेट्रो ३ प्रकल्पासाठी कायमस्वरुपी वापराकरिता केवळ २ हेक्टर व तात्पुरत्या वापराकरिता केवळ १.५ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ही जागा १२१ तुकड्यांत विभागली गेली आहे. बहुतांश जागा ही खुली असून, गिरगाव-काळबादेवी वगळता अन्य ठिकाणी काही प्रमाणात घरे व दुकाने बाधित होत आहेत. अशा बाधित कुटूंबियांना एमआरटीपी कायद्यातंर्गत नोटीस देत आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारण करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक सुनावणी समिती नेमण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोबदला समिती नेमण्यात आली आहे. आणि संबधित रहिवाशांचे म्हणणे मोबदला समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. विशेषत: बाधित कुटुंबांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे, असे भिडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दादर मेट्रो स्थानकासाठी एकूण ८ भाडेकरू कुटुंबे बाधित होत आहेत. ही कुटुंबे सतीश गुप्ते हाऊस या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्याकरिता नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य तो मोबदला दिल्याखेरिज त्यांची जागा घेण्यात येणार नाही, असेही एमएमआरसीच्या वतीने सांगण्यात आले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन बाधितांशी चर्चा केल्यानंतरच ते राहत असलेल्या परिसरात करण्यात येईल.
पुनर्वसनाबाबत दिशाभूल
By admin | Published: June 14, 2015 12:32 AM