तिवरांबाबतचा अहवाल दिशाभूल करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:26 AM2018-02-20T02:26:01+5:302018-02-20T02:26:12+5:30

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वन सर्वेक्षण अहवालात, मुंबईतील तिवरांच्या क्षेत्रात १६ चौरस किलोमीटरची वाढ झाल्याचा दावा केला होता.

Misleading report about trips | तिवरांबाबतचा अहवाल दिशाभूल करणारा

तिवरांबाबतचा अहवाल दिशाभूल करणारा

Next

मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वन सर्वेक्षण अहवालात, मुंबईतील तिवरांच्या क्षेत्रात १६ चौरस किलोमीटरची वाढ झाल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, तिवरांचे जंगल वाढत असल्याचे केंद्र म्हणत असतानाच, फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार तिवरांच्या जंगलात वाढ नाही, तर घट झाली आहे. हे म्हणणे मांडताना फाउंडेशनने ‘सॅटेलाइट इमेज’चा आधार घेतला असून, तिवरांच्या जंगलाएवढीच हानी मुंबईच्या वनक्षेत्राची झाली आहे, असेही फाउंडेशनन म्हटले आहे.
सॅटेलाइटद्वारे २०१५ साली मुंबई शहर आणि उपनगरातील तिवर क्षेत्रांचे काढण्यात आलेले छायाचित्र आणि २०१८ साली काढण्यात आलेले छायाचित्र, या दोघांची तुलना आम्ही केली आहे, असे ‘वॉचडॉग फाउंडेशन’चे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. ते म्हणाले, यामध्ये गोराई, मार्वे, आयएनएच हमला, वर्सोवा येथील छायाचित्रांचा समावेश असून, यामध्ये कोठेही तिवरांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी, केंद्राच्या अहवालास विज्ञानाचा आधार नाही. उलटपक्षी सॅटलाइटद्वारे प्राप्त छायाचित्रातून तिवरांचे क्षेत्र वाढले नसून, घटल्याचे निदर्शनास येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, तिवरांच्या संरक्षणाबाबत सरकारकडे कित्येक वेळा तक्रारी करूनदेखील
काहीच कारवाई करण्यात येत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वादळासह सागरी लाटांची तीव्रता कमी करण्याकरिता कांदळवनांची मदत होते. सागरी लाटा आणि वारे यांच्यापासून किनारी क्षेत्राची धूप कमी करण्याकरिता तिवरे मोलाची मदत करतात.
समुद्रात मिसळणारी प्रदूषके गाळून पाण्याची गुणवत्ता सुधारण्याचे काम तिवर करते. असे असूनही तिवरांच्या हानीकडे प्रशासन लक्ष देत नाही, याकडे त्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले.

केंद्र सरकारचा अहवाल सांगतो
मुंबईतील तिवरांच्या क्षेत्रात १६ चौरस किमीची वाढ झाली आहे, असा दावा केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वन सर्वेक्षण अहवालात केला आहे.भांडुप, कांजूरमार्ग, मंडाले, चारकोप आणि मनोरी येथील खाडी भागातील जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले असून, भांडुप आणि कांजूरमार्ग येथील चांगले यश येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ४ हजार हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. त्यापैकी २७७ हेक्टर हे मुंबई शहरात आणि ३ हजार ७२३ हेक्टर हे मुंबई उपनगरात आहे. बोरीवली परिक्षेत्रात १ हजार ३६५ हेक्टर, कुर्ला येथे २ हजार २८८ हेक्टर आणि अंधेरी परिक्षेत्रात
७० हेक्टरवर खारफुटीचे अस्तित्व आहे.

Web Title: Misleading report about trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.